"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:07 PM2024-06-19T14:07:34+5:302024-06-19T14:10:38+5:30

PM Narendra Modi at Nalanda University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले.

Pm Narendra Modi inaugurates new campus of Nalanda university in Bihar makes huge statement | "आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश

"आगीत पुस्तकं जळू शकतात, पण ज्ञानाचा नाश होत नाही"; नांलदा विद्यापीठात PM मोदींचा संदेश

PM Narendra Modi at Nalanda University: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बिहारच्या राजगीर मधील ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे आज उद्घाटन केले. सकाळी नालंदा विद्यापीठात पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम विद्यापीठाच्या ऐतिहासिक वारशाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, केवळ भारताचाच नाही तर जगातील अनेक देशांचा वारसा नालंदाशी जोडला गेला आहे. नालंदा विद्यापीठाकडून असे शिकता येते की आगीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळतात, पण ज्ञान मात्र कायम अबाधित राहते.

"तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या १० दिवसांतच मला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नालंदाला भेट देण्याची संधी मिळाली. ही बाब मी भारताच्या विकासाच्या प्रवासाचे एक शुभ चिन्ह म्हणून मानतो. नालंदा ही एक ओळख आहे, सन्मान आहे. नालंदा एक मूल्य आहे, एक मंत्र आहे, एक अभिमान आहे, एक कथा आहे. नालंदा हे एक असे सत्य आहे जे स्पष्टपणे सांगते की, अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात, परंतु अग्नीच्या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत. हे नवीन कॅम्पस भारताची नवी क्षमता जगाला दाखवेल. नालंदा दाखवून देईल की जी राष्ट्रे भक्कम मानवी मूल्यांवर आधारित असतात, त्यांना इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया घालणे जमते," असे मोदी म्हणाले.

"नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाशीच निगडीत नाही, तर जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा त्याच्याशी निगडीत आहे. आमच्या भागीदार देशांनीही नालंदा विद्यापीठाच्या पुनर्बांधणीत सहभाग घेतला आहे. या निमित्ताने मी भारताच्या सर्व मित्र देशांचेही अभिनंदन करतो. प्राचीन नालंदामध्ये मुलांचा प्रवेश त्यांच्या ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर केला जात नव्हता. प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण इथे यायचे. नालंदा विद्यापीठाच्या या नव्या कॅम्पसमध्ये पुन्हा तीच प्राचीन व्यवस्था अधिक प्रभावीपणे राबवली जाईल. 'वसुधैव कुटुंबकम्' याचे नालंदा हे सुंदर प्रतीक आहे," असेही मोदींनी अभिमानाने सांगितले.

Web Title: Pm Narendra Modi inaugurates new campus of Nalanda university in Bihar makes huge statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.