PM Narendra Modi: “सूरत म्हणजे मिनी-भारतच आहे”; PM नरेंद्र मोदींनी केले ३४०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 03:43 PM2022-09-29T15:43:36+5:302022-09-29T15:44:15+5:30
गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर विकास कामांना वेग आला असून गरिबांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Narendra Modi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी येथे भेट देणार आहेत. याठिकाणच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून, लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूरत येथे हजारो प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून सूरतमध्ये त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यावेळी नरेंद्र मोदींच्या हस्ते यावेळी भूमीपूजन पार पडले. गुजरातमध्ये ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार असून, त्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. गुजरातमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. मोदींच्या स्वागतासाठी सूरतमध्ये लोकांची गर्दी झाली होती.
सूरत म्हणजे मिनी-भारतच आहे
गुजरातमध्ये डबल इंजिन सरकार आल्यानंतर घर बांधणीच्या कामाला वेग आला आहे. सूरतमधील मध्यमवर्गीय, गरीब लोकांनाही सुविधा मिळत आहेत. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत देशातील चार कोटी रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत. यामधील ३२ लाख गुजरात आणि १ लाख २५ हजार सूरतमधील आहेत. नवरात्र साजरी होत असतानाच पायाभूत सुविधांचे भूमीपूजन, क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करणे हे माझे भाग्य समजतो. सूरत हे एकतेचे उत्तम उदाहरण आहे. देशभरातील लोक सूरतमध्ये वास्तव्यास आहेत. ही मिनी-भारत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.