पंतप्रधान मोदी स्मृती इराणींसमोरच म्हणाले, सास भी कभी बहू थी; अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 04:44 PM2020-01-24T16:44:39+5:302020-01-24T16:55:24+5:30
नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या.
नवी दिल्ली: देशभरातून 10 मुली आणि 12 मुले अशा एकूण 22 जणांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहे. याच पार्श्वभूमिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय शौर्य विजेत्या मुलांची भेट घेऊन यशस्वी जीवनाचा मंत्र दिला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील उपस्थित होत्या.
नरेंद्र मोदींनी विविध मुद्यावरुन मुलांसोबत गप्पा मारत अनेक आठवणी सांगितल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित असलेल्या एका मुलाने तुम्हाला आईची आठवण येत नाही का असा प्रश्व विचारला होता. यावर मला जेव्हा आईची आठवण येते तेव्हा माझा सर्व थकवा दूर होतो असं मोदींनी सांगितले. या प्रश्नोत्तरामध्ये नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींना लोकप्रियता मिळालेल्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेचा उल्लेख केल्याने मुलांसोबत स्मृती इराणी यांना देखील हसू अनावर झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांसोबत संवाद साधताना मुलं देशाचे भविष्य असल्याचे सांगत पुढील वाटचालींसाठी मुलांना यशस्वी कानमंत्र दिला. तुमच्या शौर्याची गोष्ट ऐकून माझ्यासह प्रत्येकाला अभिमान असल्याचे यावेळी नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच तुम्ही काही यश प्राप्त कराल, तेव्हा आपलं लक्ष्य काय आहे हे विसरू नका. संधीच्या शोधात राहा. मेहनत करण्यापासून अजिबात घाबरू नका, असा सल्ला देखील नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या मुलांना दिला.
नरेंद्र मोदी यांनी मुलांना विविध प्रश्न विचारले. यामध्ये नरेंद्र मोदींनी मुलांना तुम्ही पाणी कसे पिता, उभे राहून की बसून असा प्रश्न विचारला होता. यावर काही मुलांनी उभे राहून तर काही मुलांनी बसुन पाणी पितो अशी उत्तरे दिली. मात्र नरेंद्र मोदी यांनी मुलांना पाणी उभं राहून न पिता बसुन पिण्याचे आवाहन केले. तसेच अनेकवेळा आई दूध घेऊन येते. त्यावेळी एखादं काम तिच्या हातात असतं किंवा टीव्ही मालिका सुरू असते. त्यामुळे आई मुलांना लवकरात लवकर दूध पिऊन घे असं सांगते. या प्रश्नावर नरेंद्र मोदी यांनी उपस्थित असलेल्या मुलांना हो की नाही असं विचारल्यानंतर उपस्थितांकडून हो असे उत्तर आले. यानंतर मोदींनी कोणती मालिका 'सास भी कभी बहू थी' असा उल्लेख केल्याने स्मृती इराणींसह मुलांना हसू अनावर झाले.
Interacting with recipients of Rashtriya Bal Puraskar, 2020. Watch. https://t.co/aMwRIevyIf
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2020