PM Narendra Modi: 'भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न'- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 01:04 PM2022-01-20T13:04:14+5:302022-01-20T13:04:25+5:30
PM Narendra Modi: 'आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यात भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज आपण निर्माण करत आहोत.'
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'आज़ादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मोदींच्या हस्तेच ऑनलईन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबोधित करताना पीएम मोदींनी विविध विषयांवर भाष्य केले.
भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, मागील काही काळात भारताची प्रतिमा मलिन करण्याचे वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. तुम्ही सर्वजण हे तुमच्या डोळ्यांनीच पाहत आहात. आंतरराष्ट्रीय स्तरावरही बरेच प्रयत्न चालू आहेत. हे निव्वळ राजकारण आहे, असे सांगून आपण यापासून दूर जाऊ शकत नाही. हे राजकारण नाही, हा आपल्या देशाचा प्रश्न आहे. गेल्या 75 वर्षात आपण फक्त हक्कासाठी बोललो, हक्कासाठी लढलो, वेळ वाया घालवला. अधिकाराची चर्चा, काही प्रमाणात, काही वेळेसाठी, कोणत्याही एका परिस्थितीत खरी असू शकते, परंतु कर्तव्य पूर्णपणे विसरणे, ही भूमिका भारताला कमकुवत ठेवण्यात मोठी भूमिका बजावते. परंतु आता जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तेव्हा जगाने भारताला नीट ओळखले पाहिजे, ही आपलीही जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले.
नवीन भारताच्या निर्मितीमध्ये भेदभावाला जागा नाही
आज कोट्यवधी भारतीय स्वर्णिम भारताची पायाभरणी करत आहेत. देशाच्या प्रगतीतच आपली प्रगती दडलेली आहे. देश आपल्यापासून आणि देशापासूनच आपले अस्तित्व आहे. नवीन भारताच्या निर्मितीमध्ये ही जाणीव भारतीयांची सर्वात मोठी ताकद बनत आहे. आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यात भेदभावाला जागा नाही. समता आणि सामाजिक न्यायाच्या पायावर भक्कमपणे उभा असलेला समाज निर्माण करत आहोत.
जागेपमी स्वप्न पाहावी लागणार
आपल्याला आपली संस्कृती, सभ्यता, मूल्ये जिवंत ठेवायची आहेत. त्याच वेळी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या प्रणालींचे सतत आधुनिकीकरण करायचे आहे. अमृतकाळाची ही वेळ झोपेत स्वप्न पाहण्याची नाही तर जागेपणी स्वप्ने पूर्ण करण्याची आहे. येणारी 25 वर्षे मेहनत, त्याग आणि तपश्चर्य करण्यासाठी आहे. शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत आपल्या समाजाने जे गमावले ते परत मिळवण्यासाठी हा कालावधी आहे.
स्वातंत्र्यलढ्यात अनेक महिलांनी बलिदान दिले
राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले, असेही मोदी म्हणाले.