Coronavirus Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी, जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद; लसीच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर महत्त्वपूर्ण चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 10:41 PM2021-04-26T22:41:17+5:302021-04-26T22:43:53+5:30
Coronavirus Vaccine : यापूर्वी अमेरिकेनं कोरोनाच्या लसीच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर घातली होती बंदी.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्षपदी असताना कोरोनाचा (Corona Pandemic) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. यावेळी भारताने वेळोवेळी मदत केली होती. मात्र, आता भारतामध्ये कोरोनाने (India) हाहाकार माजविलेला असताना अमेरिकेने (America) मदत करण्यास नकार दिला होता. यामुळे अडचणीत आलेल्या जो बायडेन (joe biden) सरकारने लगेचच यू-टर्न घेत आताचा आमच्या मदतीची वेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी देखील हटविण्याची तयारी दर्शवली. दरम्यान, यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
"आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसंच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली. "लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचं जागतिक आव्हान सोडवू शकते," असंही ते म्हणाले.
My discussion with @POTUS@JoeBiden also underscored the importance of smooth and efficient supply chains of vaccine raw materials and medicines. India-US healthcare partnership can address the global challenge of COVID-19.
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2021
लसीच्या कच्च्या मालावरील बंदी अमेरिका हटवणार
मागील काही दिवसांच्या आडमुठ्या भूमिकेनंतर आता कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांचे अमेरिकन समकक्ष जॅक सुलविन यांच्याशी चर्चा केली. यानंतर अमेरिकेनं लसीकरणासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारतातील लसीकरण मोहिमेला गती मिळणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऍस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोविशील्ड लस तयार करते. यासाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेहून येतो. मात्र अमेरिकेनं कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे लस उत्पादन अडचणीत आलं. मात्र दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी संवाद साधल्यानंतर ही निर्यातबंदी मागे घेण्यात आली. अमेरिकेनं भारताला पीपीई किट, रॅपिड टेस्टिंग कीट, ऑक्सिजन जनेरशन संदर्भात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय अमेरिकेच्या आरोग्य खात्यातील तज्ज्ञांचं पथकही भारतात येणार आहे. हे पथक भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार आहे.
भारतातील लस उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी अमेरिकेनं लसीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. याशिवाय अमेरिकेची डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आगामी काळात भारताला २०२२ च्या अखेरपर्यंत १०० कोटी कोरोना डोस तयार करता येतील इतक्या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे.