...अन् 'त्या' क्षणी फहीम पंतप्रधान मोदींचा जबरा फॅन झाला; भेटीसाठी ८१५ किमी चालत निघाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 10:00 AM2021-08-23T10:00:47+5:302021-08-23T10:03:02+5:30
श्रीनगरमध्ये वास्तव्यास असलेला फहीम नझीर शहा पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी चालत निघाला
उधमपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर चाहता असलेला फहीम नजीर शाह श्रीनगरहून पायी निघाला आहे. जवळपास ८१५ किलोमीटरचं अंतर कापून तो दिल्ली गाठणार आहे. या पायी यात्रेमुळे पंतप्रधान मोदींचं लक्ष वेधलं जाईल आणि त्यांना भेटण्याची संधी मिळेल अशी आशा फहीमला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये इलेक्ट्रिशन म्हणून काम करणारा २८ वर्षांचा फहीम नजीर शहा स्वत:ची ओळख मोदींचा खूप मोठा चाहता अशी सांगतो.
शाह २०० किलोमीटर अंतर कापून रविवारी (काल) उधमपूरला पोहोचला. श्रीनगरच्या शालीमार परिसरात वास्तव्यास असलेला शाहनं २ दिवसांपूर्वीच पायी यात्रा सुरू केली. थोडी थोडी विश्रांती घेत शाह काल उधमपूरला पोहोचला. या कठीण यात्रेनंतर पंतप्रधान मोदींना भेटण्याचं स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा शाहला आहे. मोदींना भेटण्यासाठी शाह अतिशय आतूर आहेत. 'मी मोदींच्या भेटीसाठी पायी दिल्लीला जातोय. माझ्या पायी यात्रेमुळे त्यांचं लक्ष वेधलं जाईल अशी आशा आहे. मोदींची भेट घेणं माझं स्वप्न आहे,' असं शाहनं सांगितलं.
फहीमनं याआधीही पंतप्रधानांना भेटण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्याला यश आलं नाही. शाह गेल्या ४ वर्षांपासून मोदींना सोशल मीडियावर फॉलो करत आहे. फहीमला मोदींची भाषणं आवडतात. 'एकदा पंतप्रधान मोदी रॅलीमध्ये भाषण देत होते. त्यावेळी त्यांना अजानचा आवाज ऐकू आला. त्यांनी भाषण थांबवलं. मोदींची कृती पाहून तिथले उपस्थित चकीत झाले. मोदींच्या त्या कृतीनं त्यांनी माझ्या मनात घर केलं आणि मी त्यांचा चाहता बनलो,' असं फहीमनं सांगितलं.
जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा अधिकार संपुष्टात येऊन २ वर्ष उलटली आहेत. याबद्दल विचारलं असता परिस्थिती बदलत असल्याचं त्यानं सांगितलं. पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरवर बारीक लक्ष ठेवून असतात. त्यामुळे परिस्थिती हळूहळू बदलत आहे, असं फहीम म्हणाला.