देशाची ५जी युगात उत्तुंग झेप; PM नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ, रोजगाराच्या अमर्याद संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 05:37 IST2022-10-02T05:35:13+5:302022-10-02T05:37:44+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाइव्ह जी दूरसंचार सेवेच्या उद्घाटन सोहळ्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने दिल्लीत बसून युरोपच्या रस्त्यावर एक कार चालवली.

pm narendra modi launched the country giant leap of 5G era and unlimited employment opportunities | देशाची ५जी युगात उत्तुंग झेप; PM नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ, रोजगाराच्या अमर्याद संधी

देशाची ५जी युगात उत्तुंग झेप; PM नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ, रोजगाराच्या अमर्याद संधी

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राजधानीत प्रगती मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस-२०२२’मध्ये (आयएमसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील ५ जी दूरसंचार सेवेचा प्रारंभ शनिवारी करण्यात आला. ५ जीसोबत देशात नव्या युगाची पहाट होत असून, हे तंत्रज्ञान संधीचा सागर घेऊन आले आहे, असे मोदी यांनी याप्रसंगी सांगितले. 

मोदी यांनी म्हटले की, २ जी, ३ जी आणि ४ जी दूरसंचार सेवेच्या बाबतीत देश पूर्णत: बाहेरील देशांवर अवलंबून होता. ५ जी तंत्रज्ञान मात्र भारताने स्वत:च विकसित केले आहे. सरकारचे डिजिटल इंडिया धोरण हे उपकरणांची किंमत, डिजिटल कनेक्टिव्हिटी, डेटाची किंमत आणि डिजिटल-फर्स्ट हा दृष्टिकोन या चार खांबांवर उभे आहे. २०१४ मध्ये भारतात केवळ दोन मोबाइल हँडसेट उत्पादन प्रकल्प होते. ही संख्या आता २०० पेक्षा अधिक झाली आहे. 
पंतप्रधान मोदी यांनी ५ जीच्या निमित्ताने २ जी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसला टोमणा मारला. मोदी यांनी म्हटले की, आता तंत्रज्ञानाचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण झाले आहे. काँग्रेसच्या काळातील २ जी ची नियत आणि आताची ५ जीची नियत यात फरक आहे. यावेळी रिलायन्स जिओचे चेअरमन मुकेश अंबानी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये सांगितले की, ‘दिवाळीपर्यंत जिओची ५ जी सेवा सुरू होईल. 

राष्ट्रपतींनी स्थापन केलेल्या शाळेतील मुलेही सहभागी

- भुवनेश्वर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर या दूरवर्ती खेड्यात स्थापन केलेल्या शाळेचे १०० विद्यार्थी फाइव्ह जी दूरसंचार सेवेच्या उद्घाटन सोहळ्यात आपल्या शाळेत बसूनच सहभागी झाले. 

- ‘एसएलएस मेमोरिअल रेसिडेन्शिअल स्कूल’ असे या शाळेचे नाव आहे. रिलायन्स जिओने दाखविलेल्या प्रात्यक्षिकात ही शाळा सहभागी झाली. शाळा भुवनेश्वरपासून ३४० किलोमीटर अंतरावर आहे. गावकरीही शाळेच्या आवारात गोळा झाले होते. 

- प्रात्यक्षिकासाठी जिओच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या आवारात तात्पुरते टॉवर उभारले होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपले दिवंगत पती आणि दोन मुलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०१६ मध्ये ही शाळा सुरू केली होती.

- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मुंबईतील एका शाळेतील शिक्षकास महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा या राज्यांतील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी जोडून शैक्षणिक क्षेत्रातील आगामी क्रांतीची झलक दाखविली. मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ऑगमेंटेड रिॲलिटीचे (एआर) प्रात्यक्षिकही जिओने दाखविले.

दिल्लीत बसून चालविली युरोपातील कार! 

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाइव्ह जी दूरसंचार सेवेच्या उद्घाटन सोहळ्यात या तंत्रज्ञानाच्या मदतीने दिल्लीत बसून युरोपच्या रस्त्यावर एक कार चालवली. फाइव्ह जी तंत्रज्ञानाची ही कमाल बघून सगळेच मंत्रमुग्ध झाले. इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये एरिक्सन कंपनीच्या बुथवर मोदी यांनी हे रिमोट ड्रायव्हिंग केले. कंपनीच्या प्रतिनिधीने याबाबत मोदी यांना सूचना दिल्या. 

- मोदींनी चालविलेली कार स्वीडनमध्ये होती. फाइव्ह जी तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचे नियंत्रण मोदी यांच्या हाती देण्यात आले होते. या कारचे ड्रायव्हिंग मोदी यांनी यशस्वीरीत्या केले. पंतप्रधान चालवित असलेली कार यावेळी समोर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर दिसत होती. यावेळी अधिकारी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तिथे एकच गर्दी केली होती. 

तुमच्या शहरात केव्हा सुरू होणार? 

- सध्या देशात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन ऑपरेटर्सनी ५जी सेवा सुरू केली आहे. जिओने दुसऱ्या टप्पा नेमका कधी सुरू होणार याबाबत काहीही भाष्य केलेले नाही. 

- भारती एअरटेलने सांगितले की, २०१३ पर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केली जाईल. 

- १ ऑक्टोबर रोजी ही सेवा सर्व १३ शहरांमध्ये सुरू झालेली नाही. कंपन्यांचा दावा आहे की, दिवाळीपर्यंत सर्व १३ शहरांमध्ये सेवा दिली जाणार आहे.

हँडसेट, डेटा झाला स्वस्त

गेल्या काही वर्षांत देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे मोबाइल हँडसेटस्च्या किमती बऱ्यापैकी कमी  झाल्या आहेत. डेटा दर २०१४ मध्ये ३०० रुपये प्रति जीबी होता. तो आता १० रुपये प्रति जीबी झाला आहे. मासिक सरासरी १४ जीबी डेटा वापराचे मूल्य तेव्हा ४,२०० रुपये इतके होते. डेटा वापराचे ते मूल्य आता अवघे १२५ ते १५० रुपये झाले आहे. शून्यावर असलेली फोनची निर्यात कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: pm narendra modi launched the country giant leap of 5G era and unlimited employment opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.