नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, बॅस्टिल-डे सोहळ्यात होणार सहभागी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 08:43 AM2023-07-13T08:43:33+5:302023-07-13T08:48:42+5:30
१४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यासाठी गुरुवारी सकाळी नवी दिल्लीहून पॅरिसला रवाना झाले. या दौऱ्यात भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या विस्ताराला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. तसेच, नरेंद्र मोदी भारतीय समुदाय आणि काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे भारत फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करू शकतो. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीसाठी फ्रान्स आणि भारत सरकारमधील कराराला अंतिम रूप दिले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, १४ जुलैला होणार्या फ्रान्सच्या वार्षिक बॅस्टिल-डे परेडमध्ये भारताच्या तिन्ही सैन्यांच्या २६९ सदस्यीय दल सुद्धा सहभागी होणार आहे. यावेळी, फ्रेंच विमानांसह, भारतीय हवाई दलाची (IAF) तीन राफेल लढाऊ विमाने देखील फ्लायपास्टमध्ये सहभागी होतील. तसेच, इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी संरक्षण, अंतराळ, व्यापार आणि गुंतवणूक यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात फ्रान्स आणि भारत यांच्यातील सहकार्य पुढे नेण्यासाठी नरेंद्र मोदी चर्चा करतील.
फ्रान्स दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी अबुधाबीलाही जाणार आहेत. नरेंद्र मोदींनी गुरुवारी सकाळी ट्विट केले की, "पॅरिसला रवाना होत आहे, जिथे मी बॅस्टिल डे सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे. मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इतर फ्रेंच मान्यवरांशी चर्चेसाठी उत्सुक आहे. इतर कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदाय आणि शीर्ष सीईओ यांच्याच्यासोबत होणाऱ्या चर्चेत सहभाग घेणार आहे."
PM Narendra Modi departs from Delhi Airport for Paris to take part in the Bastille Day celebrations as the Guest of Honour. He will hold productive discussions with President Emmanuel Macron and other French dignitaries & interact with the Indian community and top CEOs. pic.twitter.com/wBCaGzzRiY
— ANI (@ANI) July 13, 2023
लष्कराचे सामर्थ्य आणखी बळकट होणार!
गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. त्यामुळे भारत फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव संरक्षण दलाने संरक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे. नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या भेटीदरम्यान राफेल खरेदीचा करार होऊ शकतो. हा करार ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे. मात्र, अंतिम खर्च करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच समजणार आहे.