जलसंवर्धनासाठी मोदींची अनोखी शक्कल; देशातील सरपंचाना पाठवले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:13 AM2019-06-16T11:13:45+5:302019-06-16T11:14:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे.
नवी दिल्ली - पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाला सुरुवात केली आहे. यावेळी मोदी सरकार जलसंवर्धनावर भर देताना दिसून येत आहे. त्यासाठी मोदींनी एक अनोखी शक्कल लढवली असून त्यांनी देशातील सर्व गावांच्या सरपंचांना पत्र पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामपंचायतीचे सरंपच आणि प्रमुखांना वैयक्तीकरित्या पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये मोदींनी यंदाच्या मान्सूनच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट टळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी असलेले हे पत्र जिल्ह्याचे कलेक्टर सरपंचांना किंवा त्या गावच्या प्रमुखांना देणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रात जास्तीत जास्त लोकांना पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना मोदींनी सरपंचांना केल्या आहेत.
मोदींनी पत्रात म्हटले की, प्रिय सरपंचजी नमस्कार. आता मान्सूनचे लवकरच आगमण होणार आहे. आपण नशीबवान आहोत की, देव आपल्याला पावसाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात पाणी देतो. आपण सगळ्यांनी मिळून या पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, गावातील लोकांशी जलसंवर्धनासंदर्भात चर्चा करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवाल, असंही मोदींनी पत्रात नमूद केले आहे.