पुन्हा मित्रोंss; पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी देशाला संबोधित करण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 09:30 PM2019-08-07T21:30:42+5:302019-08-07T21:31:26+5:30
मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 27 मार्चला देशाला संबोधित केले होते.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या देशाला संबोधित करणार आहेत. जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करत राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. यावर मोदी बोलणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 27 मार्चला देशाला संबोधित केले होते. यावेळी भारताने सॅटेलाईट पाडणारे मिसाईल असलेल्या सॅटेलाईटची चाचणी घेतली होती.
केंद्र सरकारने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम बदलत राज्याचे विभाजन केले होते. जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख यांचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेश बनविले आहेत. या दोन्ही प्रस्तावांना आधी राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत मंजुरी मिळाली होती.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्टला मोदी संबोधित करणार आहेत. मात्र, त्या आधीच मोदींनी जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर लोकांना संबोधित करण्याचे ठरविले आहे. यावेळी ते देशाच्या जनतेला कलम 370 रद्द करण्यामागची कारणे आणि फायदे सांगण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीप्रमाणे ते विरेधकांवरही शरसंधान साधण्याची शक्यता आहे.