पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 06:04 IST2024-12-20T06:03:30+5:302024-12-20T06:04:04+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन? शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होत असलेल्या ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी दिली.
७१ वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या संमेलनाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. पंतप्रधानांनी संमेलनाबाबत ज्या आस्थेने विचारपूस केली ती पाहता उद्घाटनाला ते उपस्थित राहतील, असे पवार म्हणाले.
२१ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी
तालकटोरा स्टेडियमला ‘छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले आहे. २१ फेब्रुवारीला ग्रंथदिंडी निघेल. १५०० साहित्यिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे शैलेश पगारिया यांनी सांगितले. नानक साई फाऊंडेशनच्यावतीने नांदेड ते दिल्ली अशी 'संत नामदेव साहित्य दिंडी' काढणार.