पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला केदारनाथ-बद्रीनाथ दौऱ्यावर? जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:13 PM2022-10-14T16:13:30+5:302022-10-14T16:14:02+5:30
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिमालयातील मंदिरांच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत येथील जिल्हा प्रशासनाने अधिकारी मौन बाळगून आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीपूर्वी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या संभाव्य दौऱ्यावर असणार आहे. यासाठी येथील जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हिमालयातील मंदिरांच्या प्रस्तावित दौऱ्याबाबत येथील जिल्हा प्रशासनाने अधिकारी मौन बाळगून आहेत. मात्र, सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांमध्ये प्रार्थना करतील आणि तेथे सुरू असलेल्या पुनर्बांधणी प्रकल्पांचा आढावा घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा केदारनाथला जाणार असून तेथे ते पूजा करतील आणि तेथे सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतील. त्यानंतर ते बद्रीनाथ मंदिराला भेट देतील. यानंतर बद्रीनाथ मास्टर प्लॅन अंतर्गत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, जवळपास आठवडाभर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी माना या सीमावर्ती गावाला भेट देण्याची शक्यता आहे. याठिकाणी गावकरी आणि जवानांशी चर्चा करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदाही पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार?
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय सैन्यातील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यास असल्याचे सांगण्यात येते. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यावेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवली होती. तसेच जवानांची विचारपूस केली होती.