PM Narendra Modi Live: या दिवाळीत मेड इन इंडिया वस्तू खरेदी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:33 AM2021-10-22T10:33:35+5:302021-10-22T10:41:16+5:30
PM Narendra Modi News: मोदींनी देशाने कोरोनाविरोधातील लढाईत मिळवलेल्या यशाचा उल्लेख करतानाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोठे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाविरोधातील लसींचे १०० कोटी डोस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशाने कोरोनाविरोधातील लढाईत मिळवलेल्या यशाचा उल्लेख करतानाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना मोठे आवाहन केले आहे. या दिवाळीच्या सणाला शक्यतो मेड इन इंडिया, भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केले.
मोदी म्हणाले की, दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्यामुळे बाजारामधील खरेदी वाढत आहे. एक काळ असा होता जेव्हा बाजारात मेड इन हे, मेड इन ते या देशांच्या वस्तू दिसायच्या. मात्र आता प्रत्येक देशवासी मेड इन इंडियाची शक्ती अनुभवत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही वस्तूंच्या खरेदी करताना ती मेड इन इंडिया आहे का हे पाहून खरेदी करा. भारतातील नागरिकांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन मोदींनी केले.
आपल्या देशात तयार झालेली लस आपल्याला सुरक्षा देऊ शकते. तर आपल्या देशात उत्पादित झालेले सामान आपली दिवाळी आनंदी बनवू शकते, असे विधान करत मोदींनी यंदाच्या दिवाळीत भारतीय नागरिकांनी भारतात तयार झालेल्या वस्तू खरेदी कराव्या, असे आवाहन केले.
दरम्यान, मोदी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले की, गुरूवारी भारतानं १०० कोटी डोसचं कठीण लक्ष पार केलं. यामागे देशवासीयांचा पाठिंबाही होता. हे देशवासीयांचं, भारताचं यश आहे. १०० कोटी डोस हे केवळ एक आकडा नाही. हे देशाच्या सामर्थ्यांचं प्रतिबिंब आहे. इतिहासाच्या नव्या अध्यायाची रचना आहे. कठिण ध्येयापर्यंत पोहोचणं जाणतो अशा भारताचं हे प्रतिबिंब आहे, असं मोदी देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले.
"आज अनेक लोकं अन्य देशांशी या लसीकरणाची तुलना करत आहेत. जगातील अन्य देशांसाठी लसीवर रिचर्च करणं, ते शोधणं यात ते एक्सपर्ट होते. आपण अनेक लसी बाहेरून मागवत होतो. जेव्हा १०० वर्षांमधील मोठी महासाथ आली तेव्हा भारतावर प्रश्न उपस्थित करण्य़ात आले. भारत लसी कुठून आणणार, पैसे कसे उभारणा, महासाथीला आळा घालण्यासाठी भारत प्रयत्न करू शकेल का असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. हे १०० कोटी लसींचे डोस त्याचं उदाहरण देत आहे. आज भारतानं १०० कोटी डोस मोफत दिले आहे. आज जग भारताला कोरोनापासून भारताला सर्वात सुरक्षित मानेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आज जग भारताची ताकद पाहत आहे असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.