PM Narendra Modi Live: जोवर युद्ध सुरू, तोवर शस्त्रं खाली ठेवू नका; 'मास्क'बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 10:54 AM2021-10-22T10:54:32+5:302021-10-22T11:00:37+5:30
Narendra Modi News: कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दोन लाटांचा सामना करताना भारताने काल कोरोनाविरोधातील लसिकरणामध्ये १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला होता. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी कोरोनाविरोधातील लढाईबाबत मोदींनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. कोरोनाविरोधात जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोपर्यंत मास्कसारखी शस्त्र वापरणे बंद करू नका, असे आवाहन मोदींनी केले आहे.
काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना कोरोनाविरोधात सावध होण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देश मोठे लक्ष्य समोर ठेवून ते गाठणे जाणतो. मात्र त्यासाठी आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही. त्याचं कारण म्हणजे कवच कितीही उत्तम असलं, आधुनिक असलं, पूर्ण सुरक्षेची हमी देणारं असलं, तरी जोवर युद्ध सुरू असतं, तोवर शस्त्रं खाली ठेवली जात नाहीत. त्यामुळे येणारे सण हे पूर्णपणे खबरदारी घेऊन साजरे करा.
आपल्याला जशी चपला घालूनच घराबाहेर पडण्याची सवय झालेली आहे. तशीच मास्कचीही सवय लावून घ्या. देशातील लसीकरणाने १०० कोटी डोसचा आकडा गाठला आहे. मात्र ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी मास्कला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच ज्यांनी कोरोनाविरोधातील लस घेतली आहे, त्यांनी इतरांना प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रयत्न केल्यास कोरोनाला लवकर पराभूत करू शकू. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही येणारे सण पूर्ण खबरदारी घेऊन साजरे करा, असेही मोदींना आपल्या संबोधनामध्ये सांगितले.