'खोटं बोलणारे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवतायेत'; मोदींचा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर हल्लाबोल
By ravalnath.patil | Published: September 25, 2020 01:18 PM2020-09-25T13:18:34+5:302020-09-25T13:47:30+5:30
यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
नवी दिल्ली : भारतीय जनसंघाचे नेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी कोरोना संकट काळात भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा केली. काहींना कोरोनाची लागण झाली तर काहींनी आपला जीवही गमावला, असे सांगत नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा कृषी विधेयकांवरून विरोधकांवर निशाणा साधला.
गेल्या काही दिवसांत आपल्या सरकारने तरुण व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकांच्या आयुष्यात सरकार जितके कमी हस्तक्षेप करेल तेवढे चांगले होईल. स्वातंत्र्यानंतर बरीच वर्षे शेतकऱ्यांच्या नावे अनेक घोषणा करण्यात आल्या. पण त्यांच्या घोषणा पोकळ राहिल्या, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
कृषी विधेयकांचा सर्वाधिक फायदा लहान शेतकर्यांना होईल.आता शेतकर्याची इच्छा आहे की, ते कोठेही धान्य विकू शकतील, जिथे शेतमालाला जास्त भाव मिळेल तेथे ते विकतील. यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत शेतकऱ्यांना पटवून द्यावे लागेल. जे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलले, ते आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून चालत आहेत. हे लोक खोटं बोलून शेतकऱ्यांना फसवत आहेत, असे म्हणत नरेंद्र मोदींना विरोधकांवर हल्लाबोल केला.
याचबरोबर, काही लोकांनी राष्ट्रहिताऐवजी स्वतःचे हित सर्वोच्च ठेवले आहे. शेतकर्यांना कायद्यात अडकवून ठेवले होते. त्यामुळे त्यांचे धान्य कोठेही विक्री करता आले नाही. आम्ही MSP मध्ये रेकॉर्ड वाढविला. आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यूपीए सरकारने शेतकऱ्यांना फक्त २० लाख कोटींचे कर्ज दिले होते, मात्र, आमच्या सरकारने ३५ लाख कोटींपेक्षा जास्त कर्ज दिले, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
दरम्यान, मोदी सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. संसदेत या कृषी विधेयकांना विरोधकांनी आणि सत्ताधारी एनडीएमधील काही घटक पक्षांनी विरोध दर्शविला. तरीही ही कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यामुळे कृषी विधेयकांतून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
या 'भारत बंद'मध्ये अनेक शेतकरी संघटनांसह काँग्रेस, आरजेडी, समाजवादी पार्टी, अकाली दल, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी सहभाग घेतला आहे. तसेच, या कृषी विधेयकांविरोधात देशभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज सकाळपासून अमृतसरमध्ये रेल रोको आंदोलन सुरु केले आहे. तर महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीनेही 'भारत बंद'ला पाठिंबा देण्यात आला असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
आणखी बातम्या..
- गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी होते, पण भाजपाच्या नेत्यासारखे बोलायचे, गृहमंत्र्यांची खोचक टीका
- रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध
- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ
- Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग
-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?
- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज