देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 06:35 AM2024-01-23T06:35:59+5:302024-01-23T06:38:03+5:30

प्रयत्न अन् पराक्रमाचा प्रसाद देशाला चढविण्याचे भावनिक आवाहन

PM Narendra Modi made an emotional appeal that we will take an oath to create a strong, capable, grand India | देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प

देवापासून देशापर्यंत...आता समृद्ध राष्ट्रनिर्माण; पंतप्रधान मोदी यांचा अयोध्येत दृढसंकल्प

अयोध्या :  अयोध्येत श्रीराममंदिराची  निर्मिती झाली. आता आपण समर्थ, सक्षम, भव्यदिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊ यात, असे भावनिक आवाहन करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिरासाठी आजवर बाळगलेल्या समर्पण भावनांचा विस्तार देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत करण्याचा दृढसंकल्प सोमवारी येथे व्यक्त केला. 

अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिरातील रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा मोदी यांच्या हस्ते झाली. या वेळी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास महाराज यांच्यासह देशविदेशातील हजारो मान्यवर  उपस्थित होते. प्रभू श्रीराम, हनुमान, शबरी, जटायूपासून खारीच्याही गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करून मोदी यांनी आता आपल्या देशात निराशेसाठी कोणतीही जागा नसल्याचे सांगत या गुणांपासून प्रेरणा घेत सक्षम राष्ट्रनिर्मितीत स्वत:ला झोकून देण्याचे आवाहन देशवासीयांना केले.

मंदिर तर झाले पण आता देश हेच मंदिर मानून संकल्परत होण्याचा संदेश त्यांनी विशेषत: तरुणाईला दिला. मोदी म्हणाले की, आज दैवी आत्मा आम्हाला आशीर्वाद द्यायला आले आहेत. आम्हाला ते पाहत आहेत. आपण त्यांना रिक्त हस्ते परत पाठविणार आहोत का? म्हणूनच संकल्पही केला पाहिजे. आजपासून हजार वर्षांनंतरच्या समृद्ध भारताची उभारणी आपल्याला करायची आहे. हनुमानाच्या ठायी असलेला समर्पणाचा भाव हाच समर्थ भारताचा आधार बनेल. माझी आदिवासी आई शबरी म्हणत होती, राम आयेंगे... राम आले. तिची हीच भावना समर्थ, सक्षम भारताचा आधार बनेल. आता निराशेसाठी यत्किंचितही जागा नाही. ज्यांना अशी निराशा येत असेल त्यांनी खारीचे उदाहरण घ्यावे आणि खारीसारखा वाटा देशासाठी उचलावा.

जटायूची मूल्यनिष्ठा बघा. महाबली रावणाशी तो भिडला. रावणाला आपण हरवू शकणार नाही हे ठाऊक असूनही तो भिडला, त्याच्या प्रयत्नांची ती पराकाष्ठा तुम्ही केली तर तोच राष्ट्रनिर्माणाचा आधार बनेल. चला आपण रामसेवेला राष्ट्रसेवेशी जोडू या, राष्ट्र समर्पणाच्या भावनेशी जोडू या. आम्हाला त्यासाठी पराक्रमाचा, अथक प्रयत्नांचा प्रसाद चढवावा लागेल. हा भारताचा अमृतकाळ आहे. आपण आज चंद्र, सूर्याचा वेध घेत आहोत. आपल्या समृद्ध परंपरेचा अभिमान बाळगून आपल्याला नवप्रभात लिहायची आहे. परंपरेची पवित्रता आणि आधुनिकतेची अनंतता या दोन्ही मार्गांवरून चालत भारत समृद्ध होईल. येणारा काळ यशाचा, सिद्धीचा आहे. अयोध्येतील भव्य मंदिर हे विकसित भारताचा आधार बनेल. हे मंदिर आम्हाला शिकवण देते की लक्ष्य जर सत्यावर आधारित असेल, सामूहिकता आणि संघटित शक्ती असेल तर लक्ष्य प्राप्त करणे मुळीच कठीण नाही.

शतकांच्या प्रतीक्षेनंतर आजचा क्षण आला आहे. आता आम्ही थांबणार नाही. विकासाच्या उंचीवर देशाला नेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आजचा ऐतिहासिक क्षण आपण अनेकांनी केलेला त्याग आणि तपस्येच्या पराकाष्ठेमुळे पाहू शकत आहोत. अगणित रामभक्त, कारसेवक आणि संतमहंतांचे आम्ही सगळेच ऋणी आहोत. हा उत्सवाचा क्षण आहेच, पण सोबतच भारतीय समाजाच्या परिपक्वतेचा बोध घेण्याचाही क्षण आहे. आजचा प्रसंग आमच्यासाठी केवळ विजयाचा नाही तर विनयाचाही आहे. इतिहासात झालेली गुंतागुंत; तिच्या गाठी आम्ही गंभीरतेने आणि भावुकतेने सोडविल्या. अनेक देशांना ते जमलेले नाही.  आमची ही कृतीच सांगते की आमचे भविष्य हे आमच्या गतकाळापेक्षा अधिक उज्ज्वल असेल.

श्रीराम मंदिर हे समाजातील हरेक वर्गास उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठीची प्रेरणा घेऊन आले आहे. श्रीराम विवाद नाही, श्रीराम समाधान आहे. श्रीराम फक्त आमचे नाहीत ते सगळ्यांचेच आहेत. श्रीराम वर्तमानच नाही तर अनंतकाळही आहेत. रामाच्या सर्वव्यापकतेचे दर्शन आज घडत आहे. आज अयोध्येत रामरूपात भारतीय संस्कृतीच्या प्रति असलेल्या अतूट विश्वासाचीही प्राणप्रतिष्ठा झाली आहे. ही मानवी मूल्ये आणि सर्वोच्च आदर्शांचीही प्राणप्रतिष्ठा आहे. त्यांची जगाला गरज आहे. हे केवळ देव मंदिर नाही हे भारतीय दृष्टी, दर्शन, दिग्दर्शनाचे मंदिर आहे, असे मोदी म्हणाले. मंदिर निर्मिती झाली आता आपण समर्थ, सक्षम, भव्यदिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊ या. आपल्याला आपल्या अंत:करणातील भावभावनांचा त्यासाठी विस्तार करावा लागेल. आपल्यातील ऊर्मीचा विस्तार करावा लागेल. हा विस्तार देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्रापर्यंत असा असला पाहिजे, असे मोदी म्हणाले.

२२ जानेवारी ही केवळ एक तारीख नाही तर एका कालचक्राचा प्रारंभ आहे. आजच्या दिवसाची चर्चा हजारो वर्षे होत राहील. गुलामीची मानसिकता तोडून राष्ट्र उभारणीची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. इतक्या वर्षांच्या विलंबाबद्दल प्रभू रामांनी आम्हाला माफ करावे. आज आमचे राम आले आहेत. ते आता तंबूत राहणार नाहीत. अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर राम आले आहेत. शतकानुशतकांचे अभूतपूर्व धैर्य, अनेक अनेकांचे बलिदान आणि तपस्येनंतर प्रभूराम आले आहेत. आज मी या सोहळ्याच्या निमित्ताने एका ईश्वरीय चेतनेचा साक्षीदार झालो आहे. - नरेंद्र मोदी, पंतपधान

‘राम आग नव्हे; ऊर्जा’

मोदी म्हणाले, असा काळ होता की काही लोक म्हणायचे की राम मंदिर बनले तर आग लागेल. असे लोक भारतीयांच्या सामाजिक भावनेचे पावित्र्य समजूच शकत नाहीत. मंदिराची उभारणी हे भारतीयांनी बाळगलेली शांतता, धैर्य, आपसातील सद्भाव आणि समन्वयाचे प्रतीक आहे. राम ही आग नाही ऊर्जा आहे. मी अशा लोकांना आवाहन करतो की पुन्हा विचार करा, ही ऊर्जा समजून घ्या.

श्रीरामांचे वर्णन अन् टाळ्यांचा कडकडाट

श्रीराम भारताची आस्था आहे, श्रीराम भारताचा आधार आहे, श्रीराम भारताचा विचार आहे, श्रीराम भारताचे विधान आहे, भारताची चेतना, चिंतन, प्रतिष्ठा, प्रताप, प्रवाह, प्रभाव आहे. श्रीराम नियती आहे, नीती पण आहे. श्रीराम म्हणजे नित्यता, निरंतरता, राम विश्वात्मक आहे, असे वर्णन मोदी यांनी केले, तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. 

Web Title: PM Narendra Modi made an emotional appeal that we will take an oath to create a strong, capable, grand India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.