पवारांना भेटण्याआधी मोदी कोणाला भेटले? खास भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा; समीकरणं बदलणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 02:24 PM2021-07-17T14:24:03+5:302021-07-17T14:27:38+5:30
दिल्लीतील भेटीगाठी आणि त्यांचा घटनाक्रम अतिशय लक्षवेधी; चर्चांना उधाण
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट झाली आहे. मोदी आणि पवार यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीचा नेमका तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. अनेक राष्ट्रीय विषयांवर चर्चा झाल्याचं शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करत असतानाचा फोटोदेखील ट्विट केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील भेटीमागील घटनाक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. आज पवार आणि मोदींनी पंतप्रधान कार्यालयात तासभर चर्चा झाली. त्याआधी भाजपच्या दोन केंद्रीय मंत्र्यांनी पवारांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि राजनाथ सिंह यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले. त्यांच्यात एक तास चर्चा झाली.
आधी दोन बडे मंत्री पवारांना भेटले अन् मग पवारच मोदींच्या भेटीला गेले; वाचा नेमके काय घडले
आज पंतप्रधान मोदी यांनी साडे दहाच्या सुमारास शरद पवारांना भेटले. त्याआधी काल मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मोदी आणि फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते अद्याप समजू शकलेलं नाही. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी मोदी आणि पवारांमध्ये बैठक झाली. त्यामुळे बैठकांचा घटनाक्रम चर्चेचा विषय ठरतो. या भेटीगाठींच्या सिलसिल्यामुळे राज्यातील समीकरणं बदलणार का, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान मोदी, शरद पवारांची दिल्लीत भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं; चर्चेला उधाण
देवेंद्र फडणवीसांची दिल्लीवारी
भाजपचे केंद्रातले बडे मंत्री शरद पवारांची भेट घेत असताना राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील दिल्लीवारी करून आले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदींसह काही नवनियुक्त मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र फडणवीसांच्या दिल्ली भेटीचं टायमिंग चर्चेचा विषय ठरत आहे. काल फडणवीस दिल्लीत होते. आज सकाळी ते नागपूरला परतले आणि त्यानंतर पवार-मोदींची भेट होते, हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गेल्याच महिन्यात मोदी-ठाकरेंची बैठक
गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक पवारदेखील त्यांच्यासोबत होते. या तिन्ही नेत्यांनी मोदींची भेट घेतली. यानंतर मोदी आणि ठाकरेंमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये थेट संवाद झाला. आता मोदी आणि पवारांची भेट झाली आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या दोन नेत्यांच्या पक्षप्रमुखांशी मोदी थेट संपर्क ठेवून असल्याचं दिसून आलं आहे.