मित्रों, स्वातंत्र्य दिनीच मोदींनी सव्वासो करोड देशवासीयांना फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:45 PM2018-08-15T16:45:19+5:302018-08-15T16:46:53+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी चुकीच्या पद्धतीनं सांगितली
नवी दिल्ली: स्वच्छ भारत योजनेमुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना म्हटलं. ही आकडेवारी देताना मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा उल्लेख केला. मात्र मोदींनी दिलेली आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातील आकडेवारी यात मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनानिमित्त देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला. स्वच्छ भारत अभियानामुळे आतापर्यंत तीन लाख मुलांचा जीव वाचला असल्याचं मोदी म्हणाले. यासाठी पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा संदर्भ दिला. 'मी 2014 मध्ये लाल किल्ल्यावरुन भाषण करताना स्वच्छ भारत मोहिमेची घोषणा केली. त्यावेळी काही लोकांनी माझी खिल्ली उडवली होती. सरकारनं अशा गोष्टींवर आपली उर्जा वाया घालवू नये, असा सल्ला त्यावेळी काहींनी दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल प्रसिद्ध झाला. स्वच्छ भारत अभियानामुळे 3 लाख मुलांचा जीव वाचला, असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात नमूद केलं आहे. तीन लाख गरीब मुलांचा जीव वाचवणं, ही मानवतेच्या दृष्टीनं मोठी गोष्ट आहे,' असं मोदी म्हणाले.
स्वच्छ भारत अभियानामुळे तीन लाख मुलांचा जीव वाचला का?
या वर्षाच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागानं एक अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख आहे. 'स्वच्छतेसाठी भारताकडून सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ऑक्टोबर 2019 पर्यंत ठेवण्यात आलेलं उद्दिष्ट गाठण्यात 100 टक्के यश मिळाल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल. हे अभियान पूर्णपणे यशस्वी ठरल्यास अतिसार आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतील,' असं जागतिक आरोग्य संघटनेनं अहवालात म्हटलेलं आहे.
मोदींनी जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करत त्यांच्या अहवालाचा संदर्भ दिला. मात्र ही आकडेवारी चुकीची आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरल्यास तीन लाख मुलांचा जीव वाचेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं. मात्र अद्याप ऑक्टोबर 2019 उजाडलेलं नाही. त्याला अद्याप 14 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं स्वच्छ भारत अभियान 100 टक्के यशस्वी ठरलं तर 3 लाख मुलांचा जीव वाचू शकेल, असं म्हटलं आहे. मात्र मोदींनी थेट 3 लाख मुलांचा जीव वाचला, अशी आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत लाल किल्ल्यावरुन सव्वासो करोड भारतीयांना सांगितली आहे.