आनंदोत्सव! १०० वर्षांच्या होणार नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन; जन्मदिनी पंतप्रधान उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 04:15 PM2022-06-15T16:15:11+5:302022-06-15T17:34:35+5:30
१८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांचा १०० वा वाढदिवस असून, अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन १०० वर्षांच्या होत आहेत. १८ जून रोजी हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खुद्द पंतप्रधान मोदी आपल्या आईला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचे शुभाशिर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हीराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले असून, त्यात पंतप्रधानही उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी सुंदरकांड, शिवपूजा व भजन संध्याचा त्रिवेणी कार्यक्रम होणार आहे. याशिवाय पावागढ येथील माँ काली मंदिरात पीएम मोदी ध्वजारोहण करतील. ते वडोदरा येथे जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
पंतप्रधानांच्या दौऱ्याची भाजपकडून जोरदार तयारी
पंतप्रधानांच्या दौऱ्याची भाजपकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. पावागड येथे येत असताना, पंतप्रधान मोदी मंदिरापर्यंत जाण्यासाठी पहिली लिफ्ट सेवा सुरू करणार आहेत. याशिवाय ते वडोदरा येथे दोन वेगवेगळ्या परिषदांना संबोधित करणार आहेत. वडोदरात पंतप्रधान पन्ना अध्यक्षांना संबोधित करतील. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मार्चमध्ये त्यांची आई हीराबेन यांची भेट घेतली होती. त्यांनी आई हीराबेन यांची गांधीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली होती. दोन वर्षांनी आई आणि मुलाची भेट झाली होती. यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोदी आपल्या आईला भेटले होते.