येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 17:06 IST2025-02-20T17:04:37+5:302025-02-20T17:06:04+5:30
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली.

येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी (दि.२०) पार पडला. यावेळी, रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह अनेक वरिष्ठ भाजप नेते आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत येत्या २ वर्षात जिथे जिथे निवडणुका असतील, तिथे एनडीए विरोधकांना पराभूत करेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
एनडीएच्या बैठकीला उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेतृत्व तसेच विविध एनडीए राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा समावेश होता. यासोबतच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत सरकारची धोरणे, धोरणात्मक समन्वय आणि एनडीए शासित राज्यांमधील आगामी निवडणुकांची तयारी यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए एकजूट आहे. आपण सर्वजण विकसित भारतासाठी एकत्र काम करू आणि येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही एकजुटीने आणि दृढतेने लढू, असे एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तर या बैठकीत एनडीए नेत्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले की, महाराष्ट्र आणि दिल्लीप्रमाणे एनडीए प्रत्येक निवडणुकीत विजयी होईल.
पुढील निवडणुका कधी आणि कुठे होतील?
२०२५ च्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. २०२६ मध्ये आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी येथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. यानंतर २०२७ मध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होतील.