'शांततेसाठी लाहोरला गेलो होतो, पण...', पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पीएम मोदी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 19:58 IST2025-03-16T19:57:30+5:302025-03-16T19:58:29+5:30
'जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते, तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानचे कनेक्शन समोर येते.'

'शांततेसाठी लाहोरला गेलो होतो, पण...', पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पीएम मोदी स्पष्टच बोलले
PM Narendra Modi Podcast : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन (Lex Fridman) यांच्याशी पॉडकास्टच्या माध्यमातून दीर्घ संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंधांवर विचारलेल्या प्रश्नांची अतिशय मोकळेपणाने उत्तरे दिली. पीएम मोदी म्हणाले की, 1947 पूर्वी सर्वजण खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यासाठी लढत होते. त्यानंतर देशाच्या धोरणकर्त्यांनी भारताची फाळणी मान्य केली आणि मुस्लिमांना त्यांचा देश दिला.
हे भारतातील जनतेने मोठ्या जड अंतकरणाने मान्य केले, पण त्याचे परिणामही भोगावे लागले. या फाळणीमुळे झालेल्या हत्याकांडात लाखो लोक मारले गेले. पाकिस्तानातून मृतदेहांनी भरलेल्या गाड्या येऊ लागल्या. अतिशय भितीदायक दृश्ये होती. मात्र भारताचे आभार मानून आनंदाने जगण्याऐवजी पाकिस्तानने संघर्षाचा मार्ग निवडला. जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते, तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानचे कनेक्शन समोर येते. 9/11 ची मोठी घटना अमेरिकेत घडली, त्याचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन पाकिस्तानात आश्रय घेत होता. पाकिस्तान संपूर्ण जगासाठी संकटाचा केंद्र बनला आहे, अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.
A wonderful conversation with @lexfridman, covering a wide range of subjects. Do watch! https://t.co/G9pKE2RJqh
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2025
प्रत्येक वेळी नकारात्मकच परिणाम
आम्ही सातत्याने म्हणत आहोत की, तुम्ही दहशतवादाचा मार्ग सोडा, हा सरकारी दहशतवाद थांबला पाहिजे. पाकिस्तानने सर्व काही दहशतवाद्यांच्या हातात सोडले आहे. याचा फायदा कोणाला होणार? मी स्वतः लाहोरला शांततेच्या प्रयत्नांसाठी गेलो होतो. मी पंतप्रधान झाल्यानंतर माझ्या शपथविधी समारंभासाठी खास पाकिस्तानच्या प्रमुखाला आमंत्रित केले होते, जेणेकरून ही एक शुभ सुरुवात व्हावी. पण प्रत्येक वेळी चांगल्या प्रयत्नांचे परिणाम नकारात्मकच निघाले. आम्हाला आशा आहे की, त्यांना शहाणपण येईल, असेही पीएम मोदी यावेळी म्हणाले.
कोणाची क्रिकेट टीम चांगली आहे?
याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, खेळ संपूर्ण जगाला उर्जेने भरण्याचे काम करतो. खेळाची भावना जगाला जोडण्याचे काम करते, त्यामुळे मला खेळाची बदनामी होताना बघायला आवडणार नाही. मी खेळाला मानवी विकासाच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग मानतो. कोण चांगले आणि कोण वाईट, याबद्दल बोलायचे झाले तर, मी त्यातला तज्ञ नाही. ज्यांना या खेळाचे तंत्र माहित आहे, तेच सांगू शकतात की, कोणाचा खेळ चांगला आहे. पण, कोणता संघ चांगला आहे, हे काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे, असा मिश्किल टोलाही त्यांनी यावेळी लगावला.