“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद”; PM मोदींकडून स्तुतिसुमने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 11:48 PM2023-07-22T23:48:08+5:302023-07-22T23:49:12+5:30

PM Modi Praised CM Eknath Shinde: दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब भेट घेतली.

pm narendra modi praised cm eknath shinde after meet in delhi with family | “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद”; PM मोदींकडून स्तुतिसुमने

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद”; PM मोदींकडून स्तुतिसुमने

googlenewsNext

PM Modi Praised CM Eknath Shinde: गेल्या काही राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. या दिल्ली दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे पंतप्रधान भेटीवेळी सगळे कुटुंबीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. 

देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला. महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रशंसा केली.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंची तळमळ कौतुकास्पद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिप्लाय केला. महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. 

राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो

या भेटीबाबत बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आपलेपणाने चर्चा केली, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली. गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 


 

Web Title: pm narendra modi praised cm eknath shinde after meet in delhi with family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.