नरेंद्र मोदींचा दबदबा कायम, जागतिक नेत्यांच्या रॅकिंगमध्ये तिस-या क्रमांकावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 12:51 PM2018-01-12T12:51:17+5:302018-01-12T15:12:50+5:30
गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं असून यामध्ये नरेंद्र मोदींना तिस-या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दबदबा अद्याप कायम असल्याचं एका आंतरराष्ट्रीय सर्व्हेतून समोर आलं आहे. सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक रँकिंगमध्ये तिस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. नरेंद्र मोदी आता स्वित्झर्लंडच्या दौ-यावर जाणार असून त्याआधीच हा सर्व्हे समोर आला आहे. गॅलप इंटरनॅशनल असोसिएशन आणि सी वोटर इंटरनॅशनल सर्व्हेने जगातील नेत्यांचं रॅकिंग जाहीर केलं असून यामध्ये नरेंद्र मोदींना तिस-या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्कल पहिल्या क्रमांकावर असून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुअल मॅक्रां दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-या स्थानावर आहेत.
तब्बल 50 देशांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला असून, यावेळी लोकांना यामध्ये सहभागी करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनचे राष्ट्राध्यश्र शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांना मागे टाकलं आहे. 2015 साली या रँकिंगमध्ये बराक ओबामा पहिल्या स्थानावर तर मोदी पाचव्या स्थानावर होते. महत्त्वाचं म्हणजे भारताच्या आतापर्यंतच्या पंतप्रधानाला मिळालेलं हे सर्वोत्तम रँकिंग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या स्वित्झर्लंड दौ-यावर जाणार आहेत. 22 आणि 23 जानेवारीला होणा-या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला ते हजेरी लावणार आहेत.
कोणता नेता कोणत्या क्रमांकावर -
1) अँजेला मर्कल (जर्मनी)
2) इमॅनुअल मॅक्रां (फ्रान्स)
3) नरेंद्र मोदी (भारत)
4) थेरेसा मे (इंग्लंड)
5) शी जिनपिंग (चीन)
6) व्लादिमीर पुतीन (रशिया)
7) सलमान बिन अब्दुलअझीज अल सौद (सौदी)
8) नेत्यानाहू (इस्रायल )
9) हसन रोहानी (इराण)
10) डोनाल्ड ट्रम्प ( अमेरिका)