70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे; मोदी म्हणाले, "रोजगार मेळावा भाजप सरकारची नवी ओळख"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:24 PM2023-06-13T12:24:02+5:302023-06-13T12:25:39+5:30
Rozgar Mela : नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रोजगार मेळाव्यात 70,126 तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. आज 70 हजाराहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. रोजगार मेळावा ही एनडीए-भाजप सरकारची नवी ओळख बनली आहे, असे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 'रोजगार मेळाव्या'दरम्यान नवीन भरती झालेल्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते.
"रोजगार मेळावे एनडीए आणि भाजप सरकारची नवीन ओळख बनली आहेत. मला आनंद आहे की, भाजपशासित सरकारेही अशा रोजगार मेळाव्याचे सातत्याने आयोजन करत आहेत. सध्या सरकारी नोकरीत येणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. येत्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य आहे", असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याचबरोबर, मुद्रा योजनेमुळे करोडो तरुणांना मदत झाली आहे. स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया सारख्या मोहिमांनी तरुणांची क्षमता आणखी वाढवली आहे. सरकारकडून मदत मिळालेले हे तरुण आता स्वतः अनेक तरुणांना नोकऱ्या देत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत आपली अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेत आहे - नरेंद्र मोदी
आज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. भारतावर इतका विश्वास आणि आपल्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास यापूर्वी कधीच नव्हता. सर्व अडचणी असूनही भारत आपली अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेत आहे. जगातील मोठ्या कंपन्या उत्पादनासाठी भारतात येत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याशिवाय, भारतात सरकारी व्यवस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. आज सरकार आपल्या सेवा घेऊन देशातील नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे. आज लोकांच्या अपेक्षा आणि त्या भागातील गरजा समजून घेऊन आमचे सरकार सातत्याने काम करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.