"कोरोना संसर्ग असो वा सीमेवरील आव्हान, भारत सर्वांशी लढण्यास नेहमी तय्यार"; पंतप्रधान मोदी
By देवेश फडके | Published: January 28, 2021 02:04 PM2021-01-28T14:04:47+5:302021-01-28T14:10:20+5:30
नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (NCC) कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव असो किंवा मग देशाच्या सीमांवरील आव्हाने असोत; भारत सर्वांशी लढा देण्यास नेहमी सज्ज असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या (NCC) कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत आणि तीनही सेना दलांचे प्रमुख उपस्थित होते.
भारतीय संविधानात नागरिकांची कर्तव्ये सांगितलेली आहेत आणि ती पार पाडणे सर्वांचीच जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, भारताने कोरोना लस निर्मिती केली आहे. तसेच भारतीय सैन्याचे आधुनिकीकरणही केले जात आहे. देशाला आणखीन राफेल विमाने मिळाली आहेत. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हवेतच इंधन भरता येऊ शकते. भारतीय सैन्याच्या सर्व गरजा आता देशातच पूर्ण केल्या जात आहेत, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Govt has made efforts to see that the role of NCC is further expanded. To strengthen the security network in the border and coastal areas, the participation of NCC is being boosted: PM Narendra Modi at NCC Rally at Cariappa Ground in Delhi pic.twitter.com/jUFLd2ui2l
— ANI (@ANI) January 28, 2021
ज्या देशात सामाजिक शिस्त असते, तो देश प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असतो. सर्व युवावर्गाने आपणा सर्वांकडून आणि समाजातील अन्य घटकांकडून शिस्तिचा धडा गिरवला पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले. एनसीसीचे कॅडर मदतीसाठी सदैव तत्पर असतात. कोणतेही संकट असो, ते सामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात, असे सांगत एकेकाळी आपल्याकडे नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर सक्रीय होते. मात्र, जनजागृती वाढवल्यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
एनसीसीच्या कॅडरमध्ये महिलांचे प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढले आहे. संरक्षण दलात अनेक संधी महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. शत्रूशी दोन हात करण्यासाठी देशाची वीरांगणा सज्ज आहे. आपल्या शौर्याची देशाला गरज आहे आणि नवीन यशोशिखरे आपली वाट पाहत आहेत, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.