“समाजातील स्वार्थी घटकांमुळे योजनांचा अपेक्षित लाभ गरिबांना मिळू शकला नाही”: PM मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 10:29 AM2021-08-04T10:29:24+5:302021-08-04T10:31:56+5:30
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
अहमदाबाद: कोरोना संकटामुळे अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय यांवर मोठा परिणाम होऊन बेरोजगारीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. हातावर पोट असलेल्या रोजंदारी करणाऱ्यांना तसेच गरिब घटकांचे तर खूपच हाल या कोरोना संकट काळात झाले. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा कोरोनाकाळात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली. तसेच समाजातील स्वार्थी घटकांमुळे योजनांचा अपेक्षित लाभ गरिबांना मिळू शकला नाही, असे प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले आहे. (pm narendra modi says garib kalyan anna yojana has given confidence to economically deprived)
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेच्या गुजरातमधील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. स्वातंत्र्योत्तर काळात देशात स्वस्त अन्नधान्य वाटपाच्या योजना आणि त्यासाठीचा निधी यात उत्तरोत्तर वाढ होत गेली, मात्र अकार्यक्षम वितरण यंत्रणा आणि स्वार्थी घटकांमुळे त्याचा गरिबांना पाहिजे तसा लाभ मिळू शकला नाही, असे मोदी म्हणाले.
‘मोदींचा हनुमान’ भाजपविरोधात बंडखोरी करणार? लालू प्रसाद यादवांची मोठी ऑफर; म्हणाले...
गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली
गेल्या काही वर्षांत देशात अन्नधान्याचा साठा वाढत गेला, पण लोकांची उपासमार आणि कुपोषण हे त्या प्रमाणात कमी झाले नाही. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेमुळे गरीब कुटुंबांची भाकरीची चिंता दूर झाली. या योजनेअंतर्गत कोरोना संकटाच्या कालावधीत ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. त्यासाठी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.
Adani Group चा आता महाराष्ट्र, छत्तीसगडमधील खाणींवर ताबा; लिलावात सर्वाधिक बोली!
कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही
कोरोनामुळे रोजगार धोक्यात आले. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायांवर परिणाम झाला. देशावर शतकातील हे सर्वांत मोठे संकट आले असताना कोणीही नागरिक उपाशी राहणार नाही, याची दक्षता आम्ही घेतली, असे मोदी यांनी नमूद केले. यंत्रणेत काही दोष निर्माण झाला आहे. काही स्वार्थी घटक यात घुसले आहेत. ही व्यवस्था बदलण्यासाठी २०१४ नंतर आम्ही नव्या पद्धतीने काम सुरू केले. योजनेतील खोटे लाभार्थी काढून टाकण्यासाठी नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले. शिधापत्रिकांशी आधारकार्ड जोडण्यात आले. सरकारच्या स्वस्त धान्य दुकानांत डिजिटल यंत्रणा बसविण्यात आली, असेही मोदी यांनी सांगितले.