देशाला राफेलची कमी जाणवली; लोक विचारतायत, राफेल असती तर काय झालं असतं ?- नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 07:02 AM2019-03-03T07:02:17+5:302019-03-03T07:23:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदी विरोधाच्या नादात देशहिताच्या विरोधात मतप्रदर्शन करू नका, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे. राफेल वादाचा उल्लेख करत ते म्हणाले, राफेलवरील स्वार्थी राजकारणापायी देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवते आहे.
राफेल विमानं असती तर पाकिस्तानचं काय झालं असतं, असा प्रश्न आता जनता मला विचारत आहे. मला जरूर विरोध करा, पण मोदी विरोधाचा फायदा मसूद अझहर आणि हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना होऊ देऊ नका. आज पूर्ण देश लष्कराबरोबर खांद्याला खांदा लावून उभा असतानाच विरोधक लष्कराच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित करत आहेत. अशा लोकांना मी विचारू इच्छितो की, तुम्हाला लष्कराच्या सामर्थ्यावर शंका आहे की विश्वास आहे. मोदी विरोध नक्कीच करा, आमच्या योजनांमध्ये त्रुटी काढल्यास आम्ही तुमचं स्वागतच करू. परंतु देशाच्या सुरक्षेसंबंधी बाबी आणि देशहिताला विरोध करू नका. मोदी विरोधाचा मसूद अझहर आणि हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांना फायदा होणार नाही, हे विरोधकांनी सुनिश्चित करावं.
अख्खं जग दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताच्या पाठीमागे आहे. पण देशातील काही लोक यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान म्हणाले, 2014-19पर्यंत देशाच्या गरजा पूर्ण करण्याची वेळी होती. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले आहेत. पाच वर्षांत मेहनत आणि परिश्रमानं आम्ही देशाचा पाया मजबूत केला आहे. या रचलेल्या पायावरच भारताच्या भव्य इमारतीचं निर्माण होणार आहे. नव्या भारतासाठी देशातील एका-एका वीर जवानांचं रक्त अनमोल आहे. आता कोणीही भारताकडे डोळे वटारून पाहू शकणार नाही. आज भारत निडर आणि निर्णायक आहे. सव्वाशे कोटी जनतेच्या प्रयत्नांमुळेच देश प्रगतिपथावर आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.