“तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम, विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार”; PM मोदींची लोकसभेत गॅरंटी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:28 PM2024-07-02T17:28:49+5:302024-07-02T17:29:06+5:30
PM Narendra Modi Speech In Lok Sabha: आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
PM Narendra Modi Speech In Lok Sabha: लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. यावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि एनडीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावाला उत्तर देताना विरोधी पक्षावर घणाघती टीका केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सर्वांत मोठ्या निवडणुकीनंतर जनतेने आम्हाला निवडून दिले. काही लोकांच्या वेदना समजू शकतो. सतत खोटे पसरवूनही त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले, असा खोचक टोला लगावताना, अनेक खासदारांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपली मते मांडली. विशेषत: खासदार म्हणून पहिल्यांदाच लोकसभेत आलेल्या सदस्यांनी संसदेच्या सर्व नियमांचे पालन केले. ते खासदार अनुभवी असल्यासारखे बोलत होते. पहिल्यांदाच सदस्य असूनही त्यांनी सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली. त्यांच्या विचारांनी या चर्चेला अधिक मौल्यवान बनवले, असे कौतुक पंतप्रधान मोदी यांनी केले.
विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार
जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. आमच्या प्रत्येक धोरणाचा, प्रत्येक निर्णयाचा, प्रत्येक कृतीचा एकमेव उद्देश देश प्रथम हाच आहे. या देशाने प्रदीर्घ काळापासून तुष्टीकरणाचे राजकारण मॉडेल पाहिले आहे. परंतु, आता आम्ही तुष्टीकरण नाही, तर संतुष्टीकरणाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत. विकसित भारताचा संकल्प आम्ही घेतला आहे. तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच विकसित भारताच्या संकल्पासाठी पूर्ण समर्पण, प्रामाणिकपणाने काम करू. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या वेळेतील प्रत्येक क्षण देऊ, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना दिले.
दरम्यान, तिसऱ्या कार्यकाळात तिप्पट वेगाने काम करू. आमची तिसरी टर्म म्हणजे आम्ही देशातील जनतेला तिप्पट निकाल देऊ. २०२४ च्या निवडणुकीत या देशातील जनतेने काँग्रेसला जनादेश दिला आहे. या जनादेशाचा अर्थ असा आहे की, तुम्ही विरोधातच बसा आणि आपले म्हणणे मांडले की गोंधळ करत बसा, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.