मोदी सांगतात ते वास्तव नाही; महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 06:04 PM2023-09-26T18:04:46+5:302023-09-26T18:05:21+5:30
Women Reservation Bill: "मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले."
राजस्थानातील जयपूर येथे महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला होता. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना नाईलाजाने महिला आरक्षणाला पाठिंबा द्यावा लागला. यापूर्वी देशात कुणीही महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात विचारही केला नव्हता, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यांच्या याच विधानाला आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य" -
पवार म्हणाले, "1993 साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्रं होती. देशात1993 मध्ये महाराष्ट्रात राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना जून 1993 मध्ये महाराष्ट्रात महिला आणि बालविकास हा स्वतंत्र विभाग सुरू केला. देशात असा विभाग कुठेही नव्हता. 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटना दुरुस्ती झाली. याची अंमलबजावणी सुरू झाली. त्यात देशभरात पंचायत व्यवस्था लागू झाली. घटनेचे कलम 243 ड हे समाविष्ट केले आणि महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक तृतियांश आरक्षण देण्याची तरतूद केली. त्याच वर्षी नगर पालिका, पंचायती, महापालिका यात घटनादुरुस्तीचा कायदा पास झाला. आणि शहरी भागात महिलांसाठी आरक्षण लागू झाले."
मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही -
"मला आठवते की, केआर नारायणन हे देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांच्या उपस्थित नेहरू सेंटरला या धोरणाचा विषय महिला संघटनेला सांगण्यासाठी एक संमेलन आयोजित केले होते. 22 जून 1994 ला महाराष्ट्राने देशात पहिले महिला धोरण जाहीर केले. या धोरणातूनच महाराष्ट्रात सरकारी, निमसरकारी विभागतील महिलांसाठी तीस टक्के आरक्षण ठेवण्यात आले आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ते 33 टक्के करण्यात आले. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना महिलांसंदर्भात असे निर्णय घेतले. मोदी सांगतात या देशात असा विचार कुणी केला नाही. हे वास्तव नाही," असेही पवार म्हणाले.
...तेव्हा पहिल्यांदा आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये 11 टक्के जागा महिलांसाठी ठेवल्या-
"माझ्याकडे देशाचे संरक्षण खाते होते. तेव्हा तेथे पहिल्यांदा आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये 11 टक्के जागा महिलांसाठी ठेवल्या. हल्ली, प्रजासत्ताकाची परेड दिल्लीतील महत्वाच्या रस्त्यावर होते, त्या परेडचे नेतृत्व एक भगिनी करते. हे आपण बघतो. या देशात एअरफोर्समध्ये महिलांना सहभागी करून घेतले आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.