दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्र लढतोय चांगली लढाई; मोदींकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 12:39 AM2021-05-09T00:39:27+5:302021-05-09T06:52:41+5:30
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
मुंबई : कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली व दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे सांगत कौतुक केले. मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनीदेखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य कसे नियोजन करीत आहोत, त्या विषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून, त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. (PM Narendra Modi says Maharashtra is fighting a good battle in the Corona Vieus second wave)
लसीकरणासाठी स्वतंत्र ॲपची पत्राद्वारे मागणी
१८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची मुभा द्यावी तसेच कोरोना लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्याला स्वतंत्र ॲप विकसित करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. अन्य उत्पादकांकडून लस विकत घेण्याची परवानगी मिळाली तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करता येईल, असे पत्रात म्हटले आहे.
इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
- पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत दूरध्वनीवरुन संबंधित राज्यांमधील कोरोना महामारीच्या परिस्थितीबाबत चर्चा केली.
- नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून केवळ "मन की बात" केल्याची टीका झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी यापूर्वी केली. त्यावरुन शिवराजसिंह चौहान यांनी सोरेन यांच्यावर टीका केली.
- सोरेन यांची भाषा चुकीची असल्याचे चौहान यांनी सांगितले. याशिवाय आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनीही सोरेन यांच्यावर टीका केली.