Narendra Modi : Video - आपले रामलला आता तंबूत राहणार नाहीत; प्राणप्रतिष्ठेनंतर PM मोदी भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:47 PM2024-01-22T14:47:04+5:302024-01-22T15:43:29+5:30
Narendra Modi And Ayodha Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली.
अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आज आपले राम आले आहेत असं म्हणत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. "22 जानेवारी 2024 चा हा सूर्य एक अद्भुत तेज घेऊन आला आहे... कॅलेंडरवर लिहिलेली ही तारीख नाही, तर नव्या काळचक्राचा उदय आहे."
"शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शुभप्रसंगी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. माझा कंठ दाटून आला आहे, माझं मन अजूनही त्या क्षणात गढून गेले आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत" असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
#WATCH | PM Narendra Modi says, "Ram Lalla will not stay in a tent now. He will stay in the grand temple..."#RamMandirPranPrathisthapic.twitter.com/DkbVzUwnsL
— ANI (@ANI) January 22, 2024
"हजारो वर्षांनंतरही आजच्या या तारखेची, या क्षणाची चर्चा करतील... ही केवढी मोठी रामकृपा की आपण या क्षणात जगत आहोत, प्रत्यक्ष पाहत आहोत..."असंही मोदींनी सांगितलं. मोदींनी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आता पुढे काय? असा सवाल करत उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
मोदी म्हणाले की, आज अयोध्या भूमी आम्हा सर्वांना, प्रत्येक रामभक्ताला एक प्रश्न विचारत आहे. प्रत्येक भारतीयाला एक प्रश्न विचारत आहे. काही प्रश्न विचारत आहे. श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं. आता पुढे काय? शतकांनुशतके ज्याची वाट पाहिली ते आज पूर्णत्वास गेले. आता पुढे काय? आजच्या या शुभघडीला जे दैवी आत्मे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. आम्हाला पाहत आहेत, त्यांना आपण काय असाच निरोप देणार का? नाही, अजिबात नाही. आज मला पूर्ण पवित्र मनाने वाटतं की, काल चक्र बदलत आहे. हा सुखद संयोग आहे की आम्हाला आमच्या पिढीला कालजयी पथाचे शिल्पकार म्हणून निवडलं गेलं. हजारो वर्षांनंतरची पिढी राष्ट्रनिर्माणाबाबतच्या आमच्या कार्याची आठवण काढेल. म्हणून मी सांगतो की हीच योग्य वेळ आहे. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया. रामाचे विचार मानसासोबत जनमानसामध्ये असणं हीच राष्ट्रनिर्मितीची पायरी आहे, असे मोदींनी सांगितले.