PM मोदी लवकरच २ कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत?; लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 11:55 AM2024-08-15T11:55:49+5:302024-08-15T11:57:39+5:30

आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

PM narendra Modi set to take 2 tough decisions soon Clues given from the speech at the Red Fort | PM मोदी लवकरच २ कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत?; लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले संकेत

PM मोदी लवकरच २ कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत?; लाल किल्ल्यावरील भाषणातून दिले संकेत

PM Narendra Modi Speech ( Marathi News ) :पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणातून देशातील विविध मुद्द्यांना स्पर्श केला. तसंच आगामी काळात केंद्र सरकारकडून आणखी कठोर निर्णय घेतले जाणार असल्याचे संकेतही दिले आहेत. यामध्ये समान नागरी कायद्यासह वन नेशन, वन इलेक्शन यांसारख्या निर्णयाचा समावेश असू शकतो. 

देशभरातील निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या निर्णयाचे संकेत देताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "आपल्या देशात एखादी योजना राबवत असताना त्याचा संबंध निवडणुकांशी जोडला जातो. निवडणूक जवळ आल्यानेच योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आता वन नेशन, वन इलेक्शनबाबत व्यापक चर्चा होऊ लागली आहे. राजकीय पक्षांनी याबाबत आपले विचार मांडले असून एका समितीनेही याबाबतचा अहवाल मांडला आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाने वन नेशन, वन इलेक्शनसाठी पुढे आलं पाहिजे," असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

समान नागरी कायद्याचाही विचार होणार?

देशात मागील अनेक वर्षांपासून समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होते. मात्र केंद्र सरकारकडून अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. "आपल्या देशात मागील ७५ वर्षांपासून कम्युनिल सिव्हिल कोड आहे. यामध्ये आता बदल झाला पाहिजे. आपण सेक्युलर सिव्हिल कोडच्या दिशेने जायला पाहिजे. ज्यामुळे आगामी काळात देशाला धर्माच्या आधारे होणाऱ्या भेदभावापासून मुक्ती मिळेल," असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, "जाती-पातीच्या वरती जाऊन प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवला जातो, तेव्हा देशाची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचं दिसतं. मध्यमवर्गीय कुटुंबांना उत्तम जीवन जगण्याची अपेक्षा असते. मी एक स्वप्न पाहिले आहे की, २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प पूर्ण झाला, तर त्याचा एक घटक असा असेल की, सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनात हस्तक्षेप करू नये. ससरकारमुळे कोणताही त्रास, अडथळा निर्माण होऊ नये. परंतु सरकारची गरज भासल्यास प्रशासन मदतीला उपलब्ध असेल," असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
नरेंद्र मोदींनी सांगितला देशवासियांच्या स्वप्नातील भारत

देशवासीयांना आपला भारत कसा असावा, याबाबत नेमके काय वाटते, याची एक यादीत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधनात वाचून दाखवली. विकसित भारतासाठी सरकारने सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या होत्या. हजारो देशवासीयांनी सल्ला, सूचना सरकारला पाठवल्या, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि यादी वाचून दाखवली.

Web Title: PM narendra Modi set to take 2 tough decisions soon Clues given from the speech at the Red Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.