नेटवर्कच्या समस्यांपासून मिळणार सुटका! सर्व गावांमध्ये बसवले मोबाईल टॉवर जाणार, मोदींनी दिली डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 12:46 PM2023-10-26T12:46:15+5:302023-10-26T12:47:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर आणि ४ जी कव्हरेज'चाही आढावा घेतला.
नवी दिल्ली : देशातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कच्या समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंतिम मुदत (डेडलाइडन) निश्चित केली आहे. संपूर्ण मोबाइल फोन नेटवर्क कव्हरेज प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विभागांना मार्च २०२४ पर्यंत भारतातील सर्व गावांमध्ये मोबाइल टॉवर बसवण्यासाठी सांगितले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मोबाईल नेटवर्कच्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करताना नरेंद्र मोदींनी जोर दिला की, धरणांच्या बांधकामाबाबत स्थानिक लोकांकडून आक्षेप असू शकतात, परंतु मोबाईल नेटवर्क वाढविण्यासाठी स्थानिक लोक मोबाईल टॉवर्सच्या स्थापनेला पाठिंबा देऊ शकतात. दरम्यान, 'प्रगती'च्या बैठकीत नरेंद्र मोदींनी ही माहिती दिली आहे.
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'यूएसओएफ प्रकल्पांतर्गत मोबाईल टॉवर आणि ४ जी कव्हरेज'चाही आढावा घेतला. तसेच, या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी धरणांच्या बांधकामाची तुलना मोबाईल टॉवर्सच्या स्थापनेसोबत केली, कारण अधिकाऱ्यांनी विलंबाची कारणे म्हणून जमीन आणि दुर्गम ठिकाणांची अनुपलब्धता सांगितली. एका सूत्राने सांगितले की, अधिकार्यांनी काम पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ लागेल असे सुचवले असताना, पंतप्रधानांनी आर्थिक वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्ण करावे असे सुचवले.
सुमारे चार महिन्यांतील पहिल्या 'प्रगती' बैठकीत पंतप्रधानांनी गुजरातमधील ६६ टॉवर्सच्या उभारणीला होत असलेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. मोबाईल फोन नेटवर्कचे संपूर्ण कव्हरेज प्राप्त करण्यासाठी, सरकारने विविध एजन्सींच्या केंद्रीकृत अधिकाराच्या (RoW) मंजुरीसाठी 'गतीशक्ती संचार' ही समर्पित वेबसाइट तयार केली आहे. दरम्यान, प्रगती हे ‘प्रो-एक्टिव्ह गव्हर्नन्स’ आणि वेळेवर अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठ आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश आहे.