PM मोदी राम रंगी रंगले! शेअर केला भजनाचा व्हिडिओ; म्हणाले, “भक्तिभावाने मंत्रमुग्ध...”
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 11:39 AM2024-01-03T11:39:06+5:302024-01-03T11:41:12+5:30
PM Narendra Modi News: देशवासीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील रामनामात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
PM Narendra Modi News: अवघ्या देशवासींना राम दर्शनाची आस लागली आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलल्ला विराजमान होणार आहेत. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. अयोध्येत तयारीला वेग आला आहे. निमंत्रितांच्या व्यवस्थेपासून राम मंदिरातील मूर्ती निवडीपर्यंत अनेक गोष्टी निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. यातच देशवासीयांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील रामनामात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी एका भजनाची लिंक शेअर केली आहे. श्री रामलल्लाचे स्वागत करताना स्वाती मिश्रा यांचे हे भक्तिमय भजन मंत्रमुग्ध करणारे आहे, असे कॅप्शन पंतप्रधान मोदी यांनी दिले आहे.
स्वाती मिश्रा यांचे भजन होतेय व्हायरल
स्वाती मिश्रा या बिहारच्या छपरा येथील रहिवासी आहेत. या भजनापूर्वी त्यांनी गायलेली गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. मिश्रा यांचे हे भजनही चांगलेच व्हायरल होत असून अनेक जण सोशल मिडीयावर याचे रील शेअर करताना दिसत आहेत. स्वाती मिश्रा सध्या मुंबईत असून संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. आता थेट पंतप्रधान मोदी यांनीही त्यांचे हे भजन शेअर केले आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींनी श्रीराम भजन हॅशटॅगसह भजन सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन केले होते. यानंतर त्यांनी स्वतः हे भजन शेअर केले. मन की बात या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना ते म्हणाले होते की, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी भगवान रामाशी संबंधित #SHRIRAMBHAJAN हा कॉमन हॅश टॅगसह कविता, भजन आदी सोशल मिडीयावर शेअर करा.