नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; बहिणीने सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:35 PM2019-05-30T16:35:08+5:302019-05-30T16:50:19+5:30

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. 

pm narendra modi sister vasantiben oath ceremony | नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; बहिणीने सांगितलं कारण...

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; बहिणीने सांगितलं कारण...

Next

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या शपविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या सोहळ्याला नरेंद्र मोदींच्याच कुटुंबीयांना आमंत्रण देण्यात आले नाही. आज होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बहीण वसंतीबेन यांनी याबाबत माहिती दिली. वसंतीबेन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला आमंत्रित करण्यात आले नाही. याआधी नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी सुद्धा त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. 

'मी भावाला राखी पाठवते. माझ्या भावाने सतत पुढे जावे. एक गरिबाचा मुलगा पुढे जावा, अशी माझ्या मनात नेहमीच भावना आहे. जनतेने त्यांना साथ दिली असून भरभरून मतं दिली आहेत. मी जनतेचे आभार मानते', असे वसंतीबेन यांनी सांगितले आहे. याचबरोबर, ज्यावेळी नरेंद्र मोदी वडनगरला आले होते, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली होती. तेव्हा त्यांना राखी सुद्धा बांधली होती असे सांगत वसंतीबेन म्हणाल्या, 'नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला कुटुंबीयातील कोणत्याही सदस्याला आमंत्रित करण्यात आले नाही. त्यांनी आपले जीवन देशासाठी समर्पित केले आहे'.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या आमंत्रणामध्ये परदेशी पाहुणे, विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदूत, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, भाजपसह जवळपास सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, संभाव्य मंत्र्यांचे नातेवाईक, वरिष्ठ सनदी अधिकारी यांचा समावेश आहे. यंदा प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात आमंत्रणे देण्यात आली आहेत. मोदी यांच्या 2014च्या शपथविधी समारंभाला 5 हजार जणांना बोलावण्यात आले होते.

शपथविधी सोहळा संध्याकाळी सात वाजता आहे. त्यानंतर भोजनाचाही कार्यक्रम आहे. त्यात भारताच्या सर्व राज्यांची वैशिष्ट्ये असलेले शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थ असतील, असे सांगण्यात आले. शपथविधी व नंतरचा भोजन समारंभ यांची जोरदार तयारी राष्ट्रपती भवनात सुरू असून, त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बुधवारी अर्धा दिवस लवकर सोडण्यात आले.

Web Title: pm narendra modi sister vasantiben oath ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.