आता तारखा दहशतवादी नव्हे, आपण ठरवतो- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 03:08 PM2019-10-19T15:08:49+5:302019-10-19T15:17:22+5:30
पंतप्रधान मोदींकडून प्रचारात पुन्हा कलम ३७० चा मुद्दा उपस्थित
इलेनाबाद: जम्मू काश्मीरमध्ये काय होणार, कोणत्या दिवशी काय घडणार, हे आधी फुटिरतावादी, दहशतवादी आणि बाजूच्या देशातली काही माणसं ठरवायची. मात्र आता सर्व काही आपण ठरवतो, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कलम ३७० चा विषय काश्मीरसाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. पंतप्रधान पदाची खुर्ची येत जात राहते. मात्र काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले. ते हरयाणातील प्रचारसभेत बोलत होते. हरयाणाची निवडणूकदेखील महाराष्ट्रासोबत आहे.
आधीच्या सरकारच्या काळात काश्मीरमध्ये कधी काय घडणार, याचं कॅलेंडर दहशतवादी ठरवायचे. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, बुधवारी काय होणार. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कोणत्या घडामोडी घडणार, याचं संपूर्ण कॅलेंडर फुटिरतावादी, दहशतवाद्यांकडे असायचं. त्यांच्याकडून सर्व तारखा निश्चित केल्या जायच्या. मात्र आता ते तारखा ठरवत नाहीत. तर आपण ठरवतो. आपली धोरणं आपण ठरवतो. आता ते आपलं भाग्य ठरवणार नाहीत. कारण देश बदलला आहे, अशा शब्दांत मोदींनी प्रचारात कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला.
पाकिस्तान से भेजे आतंकवादियों के बल पर, अलगाववाद के नाम पर और अनुच्छेद 370 दिखाकर डराया जाता रहा।
— BJP (@BJP4India) October 19, 2019
पहले सारा कैलेंडर आतंकी तय करते थे।
अब कैलेंडर वो तय नहीं करेंगे। अब तारीखें हिंदुस्तान तय करेगा: पीएम मोदी #BJPWinningHaryanapic.twitter.com/NOufLP4KnN
आधी शेजारच्या देशातून आलेल्या इशाऱ्यांवर काश्मीरमध्ये घडामोडी व्हायच्या. तिथून सूत्रं हलली की काश्मीरमध्ये खेळ सुरू व्हायचा. आपले जवान शहीद व्हायचे. तिरंग्याला आग लावली जायची. तो पायदळी तुडवला जायचा. कारण काश्मीरमधील दोन कुटुंबाना मनमानी करायला दिली की तिथली परिस्थिती नियंत्रणात राहील, असं दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना वाटायचं. दोन कुटुंबांनी काश्मीरला लुटलं तरी चालेल, अशी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांची मानसिकता होती. मात्र काश्मीर असं धगधगतं ठेवता येणार नाही. पंतप्रधानपद येत जात राहील. पण काश्मीर टिकायला हवं, असं मोदी म्हणाले.