एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
By जयदीप दाभोळकर | Published: January 28, 2021 01:53 PM2021-01-28T13:53:36+5:302021-01-28T13:55:40+5:30
प्रशिक्षणाला सुरूवात, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधित
पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गुरूवारी दिल्लीतील राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलं. "संविधानात नागरिकांच्या कर्तव्यांबाबत सांगण्यात आलं आहे, त्याचं पालन करणं हे सर्वांचं दायित्व आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच विषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान भारत त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच आता एनसीसीला मोठी जबाबदारी देण्यात येणार असून प्रशिक्षणही सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि तिनही दलांचे प्रमुख उपस्थित होते.
"विषाणू असो किंवा सीमेवरील आव्हा भारत पूर्ण ताकदीनीशी तयार आहे हे गेल्या वर्षानं सर्वांना दाखवून दिलं आहे. आज देशात दोन स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लसी तयार करण्यात आल्या आहेत. लष्कराचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. देशाला राफेल विमानंदेखील मिळाली आहेत. लष्कराच्या गरजा आता भारतातच पूर्ण करण्यात येत आहेत," असंही मोदी यावेळी म्हणाले.
Be it the floods or any other calamity, NCC cadets helped the people of this country last year. During the Corona period, lakhs of cadets worked with the administration & society across the country. It is commendable: PM Narendra Modi at NCC Rally at Cariappa Ground in Delhi pic.twitter.com/572dRdWlVo
— ANI (@ANI) January 28, 2021
"या ठिकाणी येऊन मला कायमच सुखद अनुभव येतो. प्रत्येकाला अभिमान वाटतो. ज्या देशांमध्ये शिस्त आहे त्या देशांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव उंचावलं आहे. सर्व तरूणांनी आपल्या आसपासच्या लोकांनाही शिस्त शिकवली पाहिजे," असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला. "देशात जेव्हा कोणतंही महत्त्वाचं काम असतं त्यावेळी एनसीसीचे कॅडेट्स त्या ठिकाणी हजर असतात. संकटकाळातही मदतीसाठी ते पुढे असतात. संविधानात नागरिकांच्या कर्तव्याबबात सांगण्यात आलं आहे. परंतु त्याचं पालन करणं हे प्रत्येकाचं दायित्व आहे. देशात नक्षलवादाची मोठी समस्या होती. परंतु लोकांमध्ये झालेल्या जनजागृतीमुळे नक्षलवादाचं कंबरडं आता मोडलं आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
On 15th August last year, it was announced that NCC will be given new responsibilities in around 175 districts in the coastal and border areas. For this around, 1 lakh NCC cadets are being trained by Army, Navy and Air Force. Of these, 1/3rd cadets are girls: PM Narendra Modi https://t.co/gaovKwb4kf
— ANI (@ANI) January 28, 2021
एनसीसीला मोठी जबाबदारी
"एनसीसीच्या कार्यक्षेत्राचा आता विस्तार करण्यात येणार आहे. सीमावर्ती भाग, सुमद्र किनाऱ्यांशी निगडीत सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी एनसीसीला सामावून घेतलं जाणार आहे. यासाठी एक लाख कॅडेट्सना प्रशिक्षण दिलं जात आहे. आता मोठ्या प्रमाणात मुलीही कॅडेट्सचा भाग बनू लागल्या आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.