तालिबान संकट; PM मोदींचा राष्ट्रपती पुतीन यांना फोन, तब्बल 45 मिनिटे चालली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:07 PM2021-08-24T17:07:47+5:302021-08-24T17:09:10+5:30
भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत 16 ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे.
नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्येतालिबानचा धुमाकूळ सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आज फोनवरून चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटे विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी, अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. दोन्ही नेत्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मोदी म्हणाले, त्यांनी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत अफगाणिस्तानमधील सध्याच्या घडामोडींसंदर्भात सविस्तर आणि आवश्यक विषयांवर चर्चा केली. यावेळी आम्ही कोरोनाविरुद्ध भारत-रशिया सहकार्यासह द्विपक्षीय मुद्द्यांवरही चर्चा केली. महत्त्वाच्या मुद्द्यांवर योग्य सल्लामसलत सुरूच ठेवण्यावर आमची सहमती झाली आहे.
ऑपरेशन देवी शक्ती -
भारताने अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत 16 ऑगस्टपासून आतापर्यंत सुमारे 800 लोकांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी म्हणजेच 24 ऑगस्टलाही 78 नागरिक काबूलहून भारतात पोहोचले आहेत.
PM Narendra Modi spoke to Russian President Vladimir Putin for about 45 minutes on the phone. They had a detailed conversation on the Afghanistan situation. pic.twitter.com/UmdafmD8zd
— ANI (@ANI) August 24, 2021
पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर नुकताच जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशीही संवाद साधला होता. हे सर्व देश सध्या अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या संकटावर लक्ष ठेवून आहेत. तसेच, काबूल विमानतळावरून सुरू असलेल्या बचाव कार्यासंदर्भातही सर्व देशांत सहकार्य सुरू आहे.