केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 09:02 AM2021-03-01T09:02:20+5:302021-03-01T09:06:39+5:30
PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू करावे लागले आहेत. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनावरील लस घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस; ट्विटद्वारे जनतेला आवाहन करत म्हणाले…
पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. भारत बायोटेकची कंपनी पूर्णपणे भारतात तयार झालेली आहे. लसीचं संशोधन आणि उत्पादन दोन्ही भारतात झालं आहे.
Took my first dose of the COVID-19 vaccine at AIIMS.
— Narendra Modi (@narendramodi) March 1, 2021
Remarkable how our doctors and scientists have worked in quick time to strengthen the global fight against COVID-19.
I appeal to all those who are eligible to take the vaccine. Together, let us make India COVID-19 free! pic.twitter.com/5z5cvAoMrv
पंतप्रधान मोदींनी लस घेताना आसामी गमछा परिधान केला होता. मोदींना लस टोचणाऱ्या नर्स पुद्दुचेरीच्या होत्या. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या दुसऱ्या नर्स केरळच्या होत्या. आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आहेत. मोदींनी लस टोचून घेतल्यानंतर काहींनी याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे मोदींनी घेतलेली कोरोना लस आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी बूस्टर डोस ठरणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
आसाम, पुद्दुचेरी, केरळमध्ये केव्हा होणार निवडणूक?
आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. २७ मार्च, १ आणि ६ एप्रिलला आसाममध्ये मतदान होईल. तर केरळ आणि पुद्दुचेरीत ६ एप्रिलला मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या राज्यांमधील निवडणुकीचे निकाल २ मे रोजी जाहीर होतील. आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. तर केरळमध्ये माकपचं सरकार आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीतील काँग्रेस सरकार काही दिवसांपूर्वीच कोसळलं आहे.