पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौऱ्यावर जाणार, कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 03:13 PM2023-07-06T15:13:15+5:302023-07-06T15:15:12+5:30
PM Narendra Modi Varanasi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 7 आणि 8 जुलै रोजी एकाच वेळी चार राज्यांना भेट देणार
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण होत असताना भाजपचे जनसंपर्क अभियान संपणार आहे. मात्र टिफिन बैठकीचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे. भाजपच्या महामंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 7 आणि 8 जुलै रोजी एकाच वेळी चार राज्यांना भेट देणार आहेत. 7 जुलैला नरेंद्र मोदी गोरखपूर येथील गीता प्रेसला भेट देणार आहेत. यानंतर त्यांचा वाराणसी दौरा असणार आहे. यादरम्यान, नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांसोबत टिफिन बैठक घेणार आहेत.
टिफिन बैठकीसाठी पन्नास हजार कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले आहे. ज्यामध्ये काही नवीन आहेत, तर काही जुने असून त्यांनी पक्षाची दीर्घकाळ सेवा केली आहे. वाराणसीतील मंडुआडीह लहरतारा रस्त्यावरील विश्वनाथ लॉनमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी टिफिन बैठक सुरू केली होती. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत ते टिफिन बैठका घेत होते.
पुन्हा टिफिन बैठक घेण्याचा निर्णय
दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या बैठकीत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे सर्व खासदार पुन्हा एकदा आपापल्या भागात टिफिन बैठक घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाजनसंपर्क अभियानात हा कार्यक्रम यापूर्वीही करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांच्या अभिप्रायानंतर पुन्हा टिफिन बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळी केवळ आमदारांनाच नाही, तर खासदारांनाही तसे करण्यास सांगितले आहे.
नव्या-जुन्या कार्यकर्त्यांसोबत बैठक
देशभरातील भाजप खासदार त्याच दिवशी म्हणजे 8 जुलै रोजी आपापल्या लोकसभा मतदारसंघात टिफिन बैठक घेतील. या बैठकीत सुमारे पाचशे जणांना बोलावण्यास सांगण्यात आले आहे. त्यातील निम्मे जुने कार्यकर्ते असतील जे आता सक्रिय राजकारणात नाहीत. मात्र ज्यांनी दीर्घकाळ संस्थेसाठी काम केले आहे. या बैठकीत जुन्या कार्यकर्त्यांबरोबरच काही तरुण कार्यकर्त्यांनाही बोलवण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही प्रकारच्या लोकांची उपस्थिती असल्याने जुन्यांचा अनुभव नवीन कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल. या विचारातून हा उपक्रम सुरू करण्यात आला.