तीन राज्यांच्या विजयानंतर PM मोदींचे काशीमध्ये भव्य स्वागत होणार; अनेक प्रकल्पांचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:19 PM2023-12-08T14:19:38+5:302023-12-08T14:26:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ डिसेंबरला दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर येणार आहेत.
नवी दिल्ली: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ डिसेंबरला दोन दिवसांच्या काशी दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून काशीमध्ये त्यांच्या भव्य स्वागताची तयारी सुरू आहे.
पंतप्रधान मोदी त्यांच्या संसदीय मतदारसंघातील लोकांसाठी १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. यासोबतच पंतप्रधान काशीतील जनतेशी संवाद साधणार असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल वाजवणार आहेत. पंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच भारतीय जनता पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ डिसेंबर रोजी दुपारी पंतप्रधान काशीला येतील. नाडेसर येथील कटिंग मेमोरियल ग्राऊंडवर विकास भारत संकल्प यात्रेत सहभागी होणार असून सहभागींशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी, नमो घाट येथे काशी तमिळ संगम कार्यक्रमात उपस्थितांना भेटतील आणि गंगा आरती करतील. त्यानंतर पंतप्रधान BLW गेस्ट हाऊसमध्ये रात्रभर मुक्काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.
१८ डिसेंबर रोजी पंतप्रधान हेलिकॉप्टरने उमराह येथे पोहोचतील. ते तेथील स्वरवेद मंदिराचे उद्घाटन करून लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर जाहीर सभा होणार आहे. भोरकला आणि शहनशाहपूरमध्ये पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी जागा शोधण्यात येत आहेत. शुक्रवारपर्यंत जाहीर सभेचे ठिकाण ठरवले जाईल, असे भाजपाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नमो घाट, फुलवारिया फोर लेनसह १५हून अधिक प्रकल्प-
काशी येथे आगमनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे पूर्ण झालेले प्रकल्प भेट देतील. यामध्ये नमो घाट, फुलवारिया फोर लेन, दोन रेल्वे ओव्हरब्रिज, रायफल शूटिंग रेंज, पं. दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमधील ५० खाटांची निवासी इमारत, शिवपूरमधील औषध गोदाम, DIET चे प्रशिक्षण केंद्र, BLW मधील टीचिंग रूम लॅब, पाच मोठे आणि १५ छोटे रस्ते यांचा समावेश आहे. याशिवाय १५ हून अधिक प्रकल्पांचा समावेश आहे.
स्वरवेद मंदिर परिसरात हेलिपॅड बांधण्यात येणार-
उमरहान येथील स्वरवेद मंदिराचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. त्यांच्या आगमनाची मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मंदिराच्या उत्तरेला हेलिपॅड बांधण्यात येणार आहे. हेलिपॅडजवळ सार्वजनिक सभेचे ठिकाण तयार करण्यात येत आहे. तसेच मंदिराभोवती सुरळीत वाहतुकीसाठी पक्का रस्ता तयार करण्याची तयारी सुरू आहे. यापूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधानांनी स्वरवेद मंदिराला भेट दिली होती. येथे त्यांनी सुमारे ५० हजार लोकांना संबोधित केले.