नरेंद्र मोदी पाच दिवस अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर जाणार, PMO कडून माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:49 PM2023-06-16T12:49:26+5:302023-06-16T15:54:42+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ज्यो बायडन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जून ते 25 जून या कालावधीत अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पीएमओ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ ज्यो बायडन आणि फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींचा दौरा न्यूयॉर्कमध्ये सुरू होईल, जिथे ते 21 जून रोजी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील. यानंतर ते 22 जून रोजी राजकीय मेजवानीचे आयोजन करतील. या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी 22 जून रोजी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनालाही संबोधित करणार आहेत.
नरेंद्र मोदी 23 जून रोजी वॉशिंग्टनमधील रोनाल्ड रीगन बिल्डिंग आणि इंटरनॅशनल ट्रेड सेंटर येथे देशभरातील आमंत्रित समुदाय नेत्यांना संबोधित करतील. यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतील. दरम्यान, या भेटीदरम्यान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमधील अनेक आघाडीच्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), व्यावसायिक आणि इतर भागधारकांशी संवाद साधणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Prime Minister Narendra Modi will visit USA and Egypt from 20 to 25 June.
— ANI (@ANI) June 16, 2023
At the invitation of US President Joseph Biden and First Lady Dr. Jill Biden, PM will pay an official State visit to USA. The visit will commence in New York, where the PM will lead the celebrations of the… pic.twitter.com/g6VWLMTOty
24 आणि 25 जूनला मोदी इजिप्तला भेट देणार
आपल्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नरेंद्र मोदी 24 ते 25 जून या कालावधीत इजिप्तला भेट देण्यासाठी कैरोला पोहोचतील. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून हा दौरा आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये नरेंद्र मोदींच्या निमंत्रणावरून इजिप्तचे राष्ट्रपती भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा असणार आहे. "राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्याव्यतिरिक्त नरेंद्र मोदी इजिप्शियन सरकारच्या वरिष्ठ मान्यवरांशी, काही प्रमुख इजिप्शियन व्यक्तींशी तसेच इजिप्तमधील भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची शक्यता आहे," परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचबरोबर, "भारत आणि इजिप्तमधील संबंध हे प्राचीन व्यापार आणि आर्थिक संबंधांवर आधारित आहेत. तसेच, दोन्ही देशांमध्ये खोल सांस्कृतिक आणि लोकांशी संबंध आहेत", असे मंत्रालयाने म्हटले आहे.