"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 07:01 PM2024-01-24T19:01:52+5:302024-01-24T19:37:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (२४ जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत आज मंत्रिमंडळाने आभार प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेला काय संदेश आहे, अशी विचारणा केली. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांना जनतेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान मंत्रिमंडळाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.
पहिल्याच दिवशी घेतला ५ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ
प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना राम मंदिर संकुल परिसरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाला. दिवसअखेरपर्यंत सुमारे पाच लाख भाविकांनी मंदिर संकुलाला भेट दिल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले.