Coronavirus: कोरोना रोखण्याचे उपाय सुचवा अन् १ लाख जिंका; पंतप्रधान मोदींचं देशवासीयांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 08:47 PM2020-03-16T20:47:33+5:302020-03-16T21:12:19+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी पर्याय सुचवा; मोदींचं आवाहन
नवी दिल्ली: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानं भारतातही दहशत पसरवलीय. अद्याप कोणालाही कोरोनावरील लस शोधण्यात यश आलेलं नाही. कोरोनावरील लस शोधण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना कोरोनाला पायबंद घालण्यासाठी उपाय सुचवण्याचं आवाहन केलंय. कोरोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा आणि १ लाख जिंका, असं मोदींनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. अवघ्या तासाभरापूर्वी पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटला आतापर्यंत शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. मोदी सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनीदेखील पंतप्रधानांचं ट्विट रिट्विट केलंय.
आपल्या पृथ्वीवरील वातावरण आरोग्यदायी करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाय सुचवा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जण तंत्रज्ञानावर आधारित उपाय सुचवत आहेत. त्यांनी हे उपाय @mygovindia वर सुचवावेत, असं आवाहन मी त्यांना करतो. अशा प्रयत्नांचा फायदा अनेकांना होईल, असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय. कोरोनाला आळा घालण्याचे उपाय सुचवण्यासाठी सरकारनं 'कोविड १९ सोल्युशन चॅलेंज'चं आयोजन केलंय. मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये माय गव्हर्नमेंट पेजची लिंकदेखील दिली आहे.
Harnessing innovation for a healthier planet.
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2020
A lot of people have been sharing technology-driven solutions for COVID-19.
I would urge them to share them on @mygovindia. These efforts can help many. #IndiaFightsCoronahttps://t.co/qw79Kjtkv2
'नागरिकांना योग्य माहिती देऊन आणि त्यांना काळजी घेण्याचं आवाहन करून विषाणूचा फैलाव रोखता येतो. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी आम्ही काही व्यक्तींची आणि कंपन्यांची मदत घेत आहोत. तंत्रज्ञान आधारित नावीन्यपूर्ण उपाय सुचवणाऱ्या, डेटासेट्स, उपचारांसाठी ऍप्स तयार करणाऱ्या व्यक्ती आणि कंपन्या यांच्याशी संपर्क साधून कोरोना विषाणू विरुद्धचा लढा आणखी समर्थपणे लढण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असं माय गव्हर्नमेंटनं 'कोविड १९ सोल्युशन चॅलेंज'ची माहिती देताना म्हटलंय.
कोरोना विषाणूचा सामना करताना आम्ही त्यात समाजालादेखील सहभागी करून घेत आहोत. कोरोना विरुद्धच्या लढ्यात तुम्हीही उपाय सुचवावेत असं आम्हाला वाटतं. सगळ्यांनी सुचवलेल्या उपायांचं मूल्यांकन करण्यात येईल आणि त्यानंतर काही सर्वोत्कृष्ट उपाय निवडले जातील. हे उपाय सुचवणाऱ्यांना योग्य बक्षीस देऊन गौरवण्यात येईल, अशी माहिती माय गव्हर्नमेंट पेजवर देण्यात आलीय. देशात आतापर्यंत कोरोनाचे ११९ रुग्ण आढळले असून त्यातल्या दोघांचा मृत्यू झालाय, तर १०५ जणांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.