भारत खरेदी करणार २६ राफेल आणि तीन पाणबुड्या? PM मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावर होऊ शकते घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 08:54 AM2023-07-11T08:54:57+5:302023-07-11T08:55:35+5:30
गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 जुलै या दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान एका मोठ्या संरक्षण कराराला मंजुरी मिळू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार भारत फ्रान्सकडून २६ राफेल आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करू शकतो. दरम्यान, गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.
नरेंद्र मोदींच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान या करारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारत फ्रान्सकडून २६ राफेल लढाऊ विमाने आणि ३ स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांनी एएनआयला सांगितले की, संरक्षण दलाने हा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयासमोर ठेवला आहे. या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रस्तावांनुसार, भारतीय नौदलाला चार ट्रेनर विमानांसह २२ सिंगल-सीटेड राफेल सीप्लेन मिळू शकतात. देशभरातील सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर नौदलाने ही लढाऊ विमाने आणि पाणबुड्या तात्काळ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रस्तावांवर यापूर्वीच संरक्षण मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकांमध्ये चर्चा झाली असून येत्या काही दिवसांत ते संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर ठेवण्याची शक्यता आहे.
याचबरोबर, विमानवाहू युद्धनौका आयएनएस (INS) विक्रमादित्य आणि विक्रांत मिग-२९ ला लढाऊ विमान राफेलची गरज आहे. दरम्यान, तीन स्कॉर्पिन-क्लास पाणबुड्या नौदलाकडून प्रकल्प ७५ चा भाग म्हणून रिपीट क्लॉज अंतर्गत अधिग्रहित केल्या जातील. ज्या मुंबईतील माझगांव डॉकयार्ड्स लिमिटेडमध्ये तयार करण्यात येतील.
९० हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा असेल करार!
हा करार ९० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. मात्र, अंतिम खर्च करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच समजणार आहे. दरम्यान, भारत करारामध्ये किंमतीत सवलत मिळवू शकतो आणि योजनेमध्ये अधिक 'मेक-इन-इंडिया' सामग्री ठेवण्यासाठी जोर वाढवू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. तसेच, राफेल डीलसाठी भारत आणि फ्रान्स या करारावर वाटाघाटी करण्यासाठी संयुक्त टीम तयार करतील अशी शक्यता सुद्धा सूत्रांनी वर्तविली आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डेला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासोबत भारत-फ्रान्स द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांची 25 वर्षे साजरी करण्यासाठी नरेंद्र मोदी फ्रान्सला भेट देतील. तसेच, या भेटीदरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान मोदींसोबत पॅरिसमधील प्रसिद्ध संग्रहालयाला भेट देणार असून पंतप्रधान मोदी प्रवासी भारतीयांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करणार असल्याची माहिती आहे.