जनतेला मान खाली झुकवावी लागेल असं ८ वर्षांत काही केलं नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 12:08 PM2022-05-28T12:08:10+5:302022-05-28T12:28:16+5:30
२६ मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली.
केंद्रातील एनडीए सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीचं ८ वर्षे पूर्ण केली. २६ मे रोजी या सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली. दरम्यान, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोटमध्ये जनतेला संबोधित केलं. गेल्या आठ वर्षांमध्ये आपण असं काहीही केलं नाही, ज्यामुळे मान खाली झुकवावी लागली, असं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी यावेळी राजकोटमधील अटकोट येथील मातुश्री केडीपी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचं उद्धाटन केलं.
“२६ मे रोजी एनडीए सरकारनं आपली आठ वर्षे पूर्ण केली. यादरम्यान आपल्या सरकारनं असं कोणतंही काम केलं नाही, ज्यामुळे जनतेला मान खाली घालावी लागली. ६ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. गरीबांसाठीही ३ कोटी घरांची निर्मिती केली गेली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले,” असं मोदी म्हणाले. जेव्हा कोरोना महासाथीच्यादरम्यान उपचाराची गरज वाढली तेव्हा आम्ही चाचण्या जलदगतीनं वाढवल्या. जेव्हा लसीकरणाची गरज भासली तेव्हा लसीही मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याचं मोदी म्हणाले.
PM Shri @narendramodi addresses public meeting in Atkot, Gujarat. #DoubleEngineInGujarat
— BJP (@BJP4India) May 28, 2022
https://t.co/qfL5eaaMrm
“भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकार राष्ट्रसेवेची आठ वर्षे पूर्ण करत आहेत. सबका साथ सबका विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न यावर आम्ही देशाच्या विकासाला गती दिली आहे. आमचं सरकार सर्व सुविधा शंभर टक्के लोकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम चालवत आहे. जेव्हा प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहोचवण्याचं लक्ष्य असतं तेव्हा भेदभाव संपतो आणि भ्रष्टाचारालाही थारा मिळत नाही,” असं ते म्हणाले.
… तर अन्न भंडारं उघडली
“गरीबांचं सरकार असेल तर ते त्यांची कशी सेवा करतं, त्यांना सक्षम बनवण्यास कसं काम करतं हे आज देश पाहत आहे. १०० वर्षांच्या मोठ्या संकट काळातही देशानं याचा अनुभव घेतला आह. महासाथीच्या सुरुवातीला अन्नाची समस्या निर्माण झाली. तेव्हा देशानं अन्नाची भंडारं खुली केली. आपल्या मात भगिनी सन्मानानं जगू शकाव्या यासाठी त्यांची जनधन खाती उघडण्यात आली. त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाऊ लागली. शेतकरी आणि मजुरांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले. घरातील स्वयंपाकघर सुरू राहावं यासाठी आम्ही मोफत सिलिंडरचीही व्यवस्था केली,” असं ते म्हणाले.