कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी?; ज्यांच्यासाठी PM नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून एअरपोर्टला पोहचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 08:00 IST2025-02-18T07:58:28+5:302025-02-18T08:00:03+5:30

पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून अमीर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत. याआधी ते २०१५ साली दिल्ली दौऱ्यावर आले होते.

PM Narendra Modi Welcome Amir of Qatar H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani at Delhi Airport | कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी?; ज्यांच्यासाठी PM नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून एअरपोर्टला पोहचले

कोण आहेत शेख तमीम बिन हमद अल थानी?; ज्यांच्यासाठी PM नरेंद्र मोदी प्रोटोकॉल तोडून एअरपोर्टला पोहचले

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी प्रोटोकॉल तोडून कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टला पोहचले. काही मोजक्याच क्षणी पंतप्रधान मोदी एखाद्या परदेशी राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी स्वत: एअरपोर्टला जातात परंतु भारत आणि कतार यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींकडून हे पाऊल उचलण्यात आले.

कतारचे अमीर अल थानी २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार समंत केले जातील. परराष्ट्र खात्यानुसार, कतारचे अमीर यांचं मंगळवारी राष्ट्रपती भवन परिसरात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक होईल. कतारचे अमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून अमीर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत. याआधी ते २०१५ साली दिल्ली दौऱ्यावर आले होते. भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झाले आहेत. यावेळीही कतारचे अमीर अल थानी यांच्या दौऱ्यावर महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी जगातील ९ वे सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांची संपत्ती जवळपास ३३५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

कोण आहेत अमीर शेख तमीम बिन अल थानी?

३ जून १९८० साली कतारच्या दोहा इथं जन्मलेले तमीम बिन अल थानी यांचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्यानंतर २५ जून २०१३ साली कतारचे अमीर बनले होते. ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करून तमीम बिन हमद यांनी कतार सैन्यात त्यांची सेवा दिली. ४४ वर्षीय तमीम ना केवळ कतारमधील सर्वात युवा श्रीमंत आहेत तर जगातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्षांमध्येही त्यांचं नाव घेतले जाते. त्यांनी ३ लग्न केलेत. तिन्ही पत्नीकडून त्यांना १३ मुले आहेत.

ब्रिटनमधून परतल्यानंतर तमीम यांना २००३ साली क्राऊन प्रिंस बनवले होते. त्यानंतर २००९ साली त्यांना सैन्यात डिप्टी कमांडर इन चीफचं पद मिळाले. खेळांमध्ये विशेष स्वारस्य असलेल्या तमीम यांना नवी ओळख जागतिक स्तरावर २००६ च्या कतारमध्ये झालेल्या एशियन गेम्सच्या यशस्वी आयोजनामुळे मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वात २०२२ साली फिफा वर्ल्ड कपचं आयोजनही कतारमध्ये आयोजित करण्यात आले होते.

दरम्यान, जून २०१३ साली शेख हमद बिन खलिफा यांनी मुलगा तमीमसाठी कतारचं अमीरपद सोडले. कतारमध्ये हे सत्तांतर अपेक्षित होते परंतु अरब देशातील नेत्यांकडून आजीवन त्यांच्या पदावर राहण्याची परंपरा होती त्यापेक्षा हा निर्णय वेगळा होता. तमीम यांच्या शासन काळात सुरूवातीला कतारच्या शेजारील राष्ट्रांसोबत नात्यांमध्ये काही अंतर आले होते. २०१७ साली सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात, मिस्त्र, बहरीन यांनी कतारसोबत संबंध तोडले होते आणि त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लावले होते.

Web Title: PM Narendra Modi Welcome Amir of Qatar H.H. Sheikh Tamim Bin Hamad Al Thani at Delhi Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.