"चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही"; पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:21 IST2025-01-10T09:28:33+5:302025-01-10T11:21:43+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत भाग घेतला

"चुका माझ्याकडूनही होतात, मी माणूस आहे, देव नाही"; पंतप्रधान मोदींच्या पहिल्या पॉडकास्टचा ट्रेलर समोर
PM Narendra Modi Podcast: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामथ यांच्या पॉडकास्ट मुलाखतीत भाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिला पॉडकास्ट इंटर्व्हू आहे. निखिल कामथ यांनी गुरुवारी या मुलाखतीचा ट्रेलर रिलीज केला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी जगातील युद्ध परिस्थिती, राजकारणातील तरुणांचा प्रवेश, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममधील फरक यावर मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चुका होतात, मीही त्या केल्या असत्या कारण मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही, असंही म्हटलं.
भारतीय उद्योजक, गुंतवणूकदार आणि स्टॉक ब्रोकर निखिल कामथ यांच्या 'पीपल बाय डब्ल्यूटीएफ' या पॉडकास्ट शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. निखिल कामथ यांनी पॉडकास्टच्या या भागाचा दोन मिनिटांचा ट्रेलर रिलीज केला आहे. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी माझ्यासाठी पॉडकास्ट पहिल्यांदाच घडत आहे, मला माहित नाही की ते तुमच्या प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचेल, असं म्हटलं. या ट्रेलरला ‘पीपल विथ पंतप्रधान नरेंद्र मोदी, ट्रेलर ऑफ एपिसोड सिक्स’ असं कॅप्शन दिलं आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान मोदी आणि निखिल कामथ यांच्यातील मजेशीर संभाषण देखील दाखवण्यात आले आहे.
मुलाखतीमध्ये निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदींना अनेक रोचक प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदींनीही या प्रश्नांना अतिशय धीटपणे उत्तरे दिली. पहिल्या टर्ममध्ये मी दिल्लीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि लोक मला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या टर्ममध्ये हे सगळं अधिक चांगले समजू लागले, असं पंतप्रधान मोगी म्हणाले. जगातील वाढत्या युद्धांबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी यांनी भारत तटस्थ नसून शांततेच्या बाजूने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही सातत्याने म्हणत आलो आहोत की आम्ही तटस्थ नाही आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, असं पंतप्रधान म्हणाले.
I hope you all enjoy this as much as we enjoyed creating it for you! https://t.co/xth1Vixohn
— Narendra Modi (@narendramodi) January 9, 2025
राजकारणातील तरुणांच्या भूमिकेवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांनी महत्त्वाकांक्षेने नव्हे तर ध्येय घेऊन राजकारणात यावे, असं म्हटलं. मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे. "चुका होतात, माझ्याकडूनही त्या झाल्या असतील. मी सुद्धा एक माणूस आहे, देव नाही," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
ट्रेलरमध्ये कामथ यांनी मी तुमच्यासमोर बसून बोलत आहे आणि मी घाबरलो पण आहे. हे माझ्यासाठी कठीण आहे, असं देखील म्हटलं. त्यावर बोलताना, "हे माझे पहिले पॉडकास्ट आहे, मला माहित नाही की तुमच्या प्रेक्षकांना हा ट्रेलर कसा वाटेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.