राज्यात 'शिंदे सरकार', केंद्रात 'ज्यु. शिंदे इन सरकार'? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 11:33 AM2022-07-19T11:33:40+5:302022-07-19T11:34:48+5:30

एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi will give a special gift to CM Eknath Shinde, Shrikant Shinde may be Minister in Central | राज्यात 'शिंदे सरकार', केंद्रात 'ज्यु. शिंदे इन सरकार'? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

राज्यात 'शिंदे सरकार', केंद्रात 'ज्यु. शिंदे इन सरकार'? पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना देणार स्पेशल गिफ्ट

googlenewsNext

नवी दिल्ली - शिवसेनेच्या आमदारानंतर आता खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीत शिवसेनेचे १९ पैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. दुपारी शिंदे समर्थक खासदारांसह पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांनंतर शिवसेना खासदारांनी वेगळी वाट धरल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दुसऱ्यांदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणाऱ्या खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सरकार केंद्रात २ मंत्रिपदे शिंदे गटाला देतील असं सांगितले जात आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परंतु घराणेशाहीला विरोध करणारे पंतप्रधान मोदी शिवसेना खासदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरात केंद्रीय मंत्रिपदाचं गिफ्ट देणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे. 

शिंदे गटाला मिळणार केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?
शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्ताराबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. २० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. 

आमचीच मूळ शिवसेना 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर खासदारांची बैठक घेऊन आमचीच मूळ शिवसेना असल्याचा दावा करतील व एनडीएमध्ये त्यांना अधिकृतपणे सामावून घेतले जाईल, असे मानले जात आहे. आमदारांच्या बंडाबाबतही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाणार आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल. 

Read in English

Web Title: PM Narendra Modi will give a special gift to CM Eknath Shinde, Shrikant Shinde may be Minister in Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.