पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 05:19 PM2024-05-24T17:19:06+5:302024-05-24T17:19:50+5:30
मोदींच्या या पत्रात त्यांनी काशीच्या लोकांना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे
Pm Modi Letter to Varanasi: लोकसभा निवडणुकीत यंदा 400 पार मजल मारण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष प्रणित NDA काम करत आहे. प्रचारसभांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांनी जोर लावला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्याच्या हेतूने संपूर्ण भाजपा कामाला लागली आहे. तशातच पंतप्रधान मोदी स्वत: वाराणसी (काशी) मधून निवडणूक लढवत आहेत. शेवटच्या टप्प्यात वाराणसी मध्ये मतदान होणार आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी काशीच्या लोकांसाठी खास पत्र लिहिले असून त्यात एक संदेश दिला आहे.
वाराणसीमध्ये मतदान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीच्या जनतेला पत्र लिहिलं आहे. वाराणसी लोकसभा केंद्रातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणाऱ्या पीएम मोदींनी काशीच्या जनतेला 1 जून रोजी भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, पीएम मोदींचे हे पत्र आतापर्यंत काशीतील सुमारे 500 कुटुंबांना पाठवण्यात आले आहे. मोदींनी लिहिलेले पत्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातील 2000 घरांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य सध्या भाजपाने ठेवले आहे. या पत्रात 1 जून रोजी मतदानासोबतच भाजपच्या समर्थनार्थ मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनम्र अभिवादन!
तुम्हाला माहितीच आहे की, भारताच्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू आहे. काशी लोकसभा मतदारसंघात १ जून रोजी मतदान होणार आहे. काशीतील तुम्हा सर्वांनी मला दिलेल्या प्रेमामुळे मी देखील 'बनारसी' बनलो आहे. फक्त खासदारच नाही तर मी स्वतःला काशीचा मुलगाच समजतो.
आपणा सर्वांना विनंती आहे की १ जून रोजी भाजप पक्षाच्या बाजूने प्रत्येकी एक मत द्या. तुमच्या एका मताच्या जोरावरच देशाचे भवितव्य घडत आहे. भारताला सामर्थ्यवान बनवण्यात तुमचे मोठे योगदान आहे. काशीबद्दल बोलायचं तर माझ्यापेक्षा तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे. या दहा वर्षांत काशीच्या विकासाबाबत आम्ही जे ठराव केले होते, ते एकामागून एक पूर्ण होत आहेत. बाबा विश्वनाथांच्या आशीर्वादाने आम्ही काही करू शकलो पण अजून बरेच काही करायचे आहे. 2024 ची निवडणूक अनेक अर्थांनी खास आहे. तुमच्या मताने आणि पाठिंब्यानेच विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल.
१ जून रोजी स्वत:, परिवारातील सदस्य तसेच आपल्या संस्थेतील लोकांना मतदान करण्यासाठी सक्रीय सहभाग घ्या. संस्कृती, परंपरा, गौरव यांची उंची वाढवण्यासाठी सहकार्य करा.